Gulabrao Patil: ... तर 9 व्या दिवशी मंत्रिपद सोडेन, ५० खोकेवरुन गुलाबराव पाटलांचं थेट चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:44 PM2022-08-28T22:44:16+5:302022-08-28T22:47:31+5:30
आमदार बच्चू कडू यांनी ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणेवरुन विरोधकांना नार्मदासारख न वागण्याचे बजावले. तसेच, तुमच्याकडे पुरावे असतील तर तक्रार द्या, असे आव्हानही त्यांनी दिले होते.
मुंबई- शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. त्यातच, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी या युतीची घोषणा केली. त्यामुळे, शिंदे गटाकडून शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले. तर, ५० खोके, एकदम ओके म्हणटल्यामुळे विधानसभेच्या पायऱ्यावर झालेला राडा महाराष्ट्राने पाहिला. या घोषणेवरुन शिंदे गटातील नेते चांगलेच संतापले आहेत. बच्चू कडूंनी तर इशाराच दिला होता. आता, गुलाबराव पाटील यांनीही चॅलेंज दिलं आहे.
आमदार बच्चू कडू यांनी ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणेवरुन विरोधकांना नार्मदासारख न वागण्याचे बजावले. तसेच, तुमच्याकडे पुरावे असतील तर तक्रार द्या, असे आव्हानही त्यांनी दिले होते. आता, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या घोषणेवरुन विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच, मंत्री होणे सोपी गोष्ट नसल्याचंही ते म्हणाले.
मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र, आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके, अशा नव-नवीन घोषणा निघाल्या. पण, ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ, असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने ५० खोके घेतल्याचा आरोप शिंदे गटातील आमदारांवर करण्यात येत आहे.
घोडा मैदान जवळच आहे
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामध्ये कोणाचं नुकसान होईल, कोणाला फायदा होईल हे आज सांगता येत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचं काम सुरु केलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील बैठका घेतायत, आमचीही कामे सुरु आहेत. भाजपाही तयारी करतेय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये त्यांची लोक कामे करताय, पण शेवटी घोडामैदान दूर नाहीय. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५-६ महिन्यात होती. त्यामध्ये 'दूध का दूध, पानी का पानी' दिसेल, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.