गुलाबराव पाटील यांचा स्वत:चे भले करण्याचा कार्यक्रम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:34 PM2018-11-28T22:34:20+5:302018-11-28T22:35:56+5:30
राष्टÑवादीच्या जिल्हा बैठकीत गुलाबराव देवकर यांचे टीकास्त्र
जळगाव- जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके दुष्काळी जाहीर झाले आहेत, इतकी गंभीर परिस्थिती आहे. मात्र शासन व प्रशासन मात्र दुष्काळी उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहे. उर्वरीत धरणगाव व एरंडोल तालुकेही वगळण्याची गरज नव्हती. ते का वगळले? हे समजत नाही. मतदार संघातील मंत्री मात्र हवेत उडतात. त्यांचा स्वत:चे भले करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र दुष्काळाबाबत कुठलाही आवाज उठवलेला नसल्याची टीका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर नाव न घेता केली.
दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी तसेच पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत बुधवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी राष्टÑवादी कार्यालयात आयोजित राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, माजी आमदार दिलीप सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार, हार्दिक पटेल यांची ९ रोजी सभा
दुष्काळग्रस्त शेतकरी, बेरोजगार युवा व महागाईग्रस्त जनता यांच्या प्रश्नांवर किसान क्रांती मोर्चातर्फे ९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जळगाव येथे जी.एस. ग्राऊंडवर संघर्ष सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, गुजरातमधील पटेल आरक्षणा आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी दिली.
दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी लढा
बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती असतानाही शासन अथवा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याने गावोगावी फिरून समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनाकडे मांडाव्यात. जर तहसिलदारांनी ऐकले नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना भेटू. तरीही उपयोग न झाल्यास मोर्चा, निदर्शने, धरणे आंदोलन आदी विविध आंदोलने करावी लागतील, असे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांनी सांगितले. ते म्हणाले की, हे सरकार चारा, पाणी देऊ शकत नाही. ते मुस्लीमांना आरक्षण काय देणार? मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळाले तरी पुरे. राष्टÑवादीचीच सत्ता येणार असून त्यानंतर मुस्लीमांना आरक्षण मिळेल. तसेच पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पवार यांनी ओबीसी, आदिवासी, दलित, मुस्लीम, बहुजन यांच्यासाठी काय काम केले? याची माहिती असलेले परिपत्रक पक्षाकडून देण्यात येईल. त्याच्या प्रती पदाधिकाºयांनी गावागावात वाटाव्यात, अशी सूचना केली. अॅड.रविंद्र पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील चारा मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशात जात आहे. चारा छावण्या करण्याची गरज आहे. टँकरची मागणी होऊनही टँकर मिळत नाही. विहीर खोलीकरणाची कामे बंद आहेत. त्यामुळे प्रशासन व शासनाला जागे करण्याचे काम करावे लागणार आहे.
अजित पवारांविरोधात प्रतिज्ञापत्र दिल्याचा निषेध
जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी सांगितले की, सिंचन घोटाळा प्रकरणात सत्ता असूनही या सरकारने ४ वर्ष काहीही कारवाई केली नाही. मात्र मराठा व धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडल्याने जनमत त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे पाहून या सरकारने आता चार वर्षांनी सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले. अजित पवार व राष्टÑवादीची बदनामी करणे हेच धोरण या पाठीमागे आहे. त्याचा निषेध करून या विरोधात आंदोलन उभे करण्याचा ठराव अॅड.पाटील यांनी मांडला. त्यास योगेश देसले तसेच जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील यांनी अनुमोदन दिले.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
दुष्काळी परिस्थितीमुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस साधेपणाने साजरा केला जाणार आहे. वाढदिवसानिमित्त मुंबईत वैचारीक सत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यास जिल्ह्यातून १०० महिला जाणार असल्याचे महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांनी सांगितले. तर अल्पसंख्याक विभागातर्फे फळवाटप केले जाणार असल्याचे मानकरी यांनी सांगितले. याखेरीज आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिरही घेतले जाणार आहे. तर युवक राष्टÑवादीतर्फे १०० शाखा उघडण्यात येणार आहेत.
माजी आमदारांची बैठकीकडे पाठ
या बैठकीला माजी मंत्री देवकरांसह माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी खासदार वसंतराव मोरे उपस्थित होते. तर माजी आमदार राजीव देशमुख हे बैठक संपल्यावर पोहोचले. अन्य माजी आमदारांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. बैठकीला जि.प.चे माजी अध्यक्ष गोरख पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, वाल्मिक पाटील, उमेश नेमाडे, वाय.एस. महाजन, अल्पसंख्यांकचे सलीम इनामदार, महिला पदाधिकारी मंगला पाटील, विजया पाटील, प्रतिभा शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी निवडणुकात अस्तित्वाचा लढा
देवकर आपल्या भाषणात म्हणाले की, मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील. सोबत विधानसभाही लागण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास ८-१० महिन्यांनी त्या निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकात राष्टÑवादी पक्षाच्या अस्तित्वाचा लढा राहील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे.