गुलाबवाडी झाली ‘चिखलवाडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 10:31 PM2020-09-03T22:31:25+5:302020-09-03T22:31:33+5:30
रहिवाशांचे प्रचंड हाल : इतर मूलभूत सुविधांचाही अभाव
नांदेड, ता. धरणगाव : येथील गुलाबवाडी या बेघर वस्तीमधील नागरिक विविध मूलभूत सुविधांअभावी गेल्या कित्येक वर्षांपासून नरकयातना भोगत आहे. सध्या पावसाळ्यात तर रस्त्यांची बिकट स्थिती झाली आहे. भागाला भेट दिल्यानंतर ही गुलाबवाडी आहे की चिखलवाडी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
याबाबत अधिक वृत्त असे की, नांदेड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ अर्तंगत येणाऱ्या या भागात जवळ जवळ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे ६० गोरगरीब कुटुंब वास्तव्यास आहेत. नांदेड हे गाव पूर्वी अमळनेर तालुक्यात असताना तत्कालीन आमदार गुलाबराव पाटील यांनी बेघर कुटुंबीयांना गावालगतच शासकीय गावठाण जागा मिळवून दिली होती . म्हणून तेथील नागरिकांनी त्या वस्तीला गुलाबवाडी असे नाव दिले आहे.
या भागातील नागरी सोयीसुविधाकडे ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधींचे देखील सतत दुर्लक्षच होत आले आहे. पावसाळ्यात तर सर्वत्र चिखलाचे व मोठमोठ्या डबक्यांचेच साम्राज्य असते. पायी चालतांना देखील मोठी कसरत करावी लागते. गल्ल्यांमध्ये गटारी नाहीत, धड चांगले रस्ते नाहीत व सर्वत्र घाणीचे व गवताचे साम्राज्य पसरलेले असते. परिणामी या भागातील नागरिकांचे आरोग्य नेहमीच बिघडत असते.
मुख्य रस्त्याचेच झाले काम
गेल्यावर्षी केवळ मुख्य गावठाण चौकापासून ते गुलाबवाडी भागापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे क्रॉँक्रिटीकरण वगळता दुसरी कोणतीही विकासाची कामे या भागात झालेली नाहीत . निवडणुकांच्या वेळी केवळ मतं मागण्यापुरतीच या भागाला लोकप्रतिनिधी भेट देऊन विविध आश्वासने देऊन निघून जातात, निवडून आल्यानंतर ढुंकूनही बघत नाहीत, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
पुनर्वसन रखडले
गुलाबवाडीचा हा भाग पाडळसरे धरणाच्या बाधित क्षेत्रात येत आहे . धरण मंजूर होऊन कित्येक वर्षांचा कालावधी उलटला तरीदेखील येथील नागरिकांचे पुर्नवसन रखडलेलेच आहे. पूनर्वसनासाठी योग्य जागा मिळावी म्हणून या भागातील नागरिक जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी लढा देत असून अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी या कामी पाहिजे तसं सहकार्य करीत नसल्याचे सांगितले जाते. यामुळे सध्यातरी त्यांचे पूनर्वसनाचे स्वप्न अधुरेच आहे.
गुलाबवाडीच्या रहिवाशांची गुलाबरावांकडे अपेक्षा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील हा भाग असल्यामुळे त्यांनी लक्ष घालून गुलाबवाडीवासीयांच्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा येथील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे .