गुलाबवाडी गाव नटले गुलाबी रंगाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 08:20 PM2019-12-09T20:20:36+5:302019-12-09T20:24:09+5:30
जि.प.प्राथमिक शाळा, पुनखेडे येथील शिक्षक जितेंद्र गवळी यांनी महाराष्ट्रातील पहिले पिंक व्हिलेजची निर्मिती नाशिक जिल्ह्यात कार्यरत असतांना केली होती. त्याच धर्तीवर त्यांनी ‘एक गाव, एक रंग’ हा उपक्रम हाती घेत गुलाबवाडी ता.रावेर या गावात हा उपक्रम राबवित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाल, जि.जळगाव : येथील रहिवासी व जि.प.प्राथमिक शाळा, पुनखेडे येथील शिक्षक जितेंद्र गवळी यांनी महाराष्ट्रातील पहिले पिंक व्हिलेजची निर्मिती नाशिक जिल्ह्यात कार्यरत असतांना केली होती. त्याच धर्तीवर त्यांनी ‘एक गाव, एक रंग’ हा उपक्रम हाती घेत गुलाबवाडी ता.रावेर या गावात हा उपक्रम राबवित आहेत.
देशात ज्याप्रमाणे पिंक सिटी- गुलाबी शहर- जयपूर असू शकतं, तर मग पिंक व्हिलेज- गुलाबी गाव हे माझं गुलाबवाडी का असू शकत नाही..? ही छोटीशी कल्पना मनात आणून गवळी गुरुजींनी गुलाबवाडी गावातील सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन जिल्ह्यातील पहिलं गुलाबी गांव निर्माण करण्यासाठी झटत आहेत.
गुलाबवाडी गावात सर्वच आलबेल आहे, असं नाही. तिथं असलेल्या समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण गावकरी आज या ‘गुलाबी गाव’ संकल्पनेमुळे एकजुट झालेले आहेत, हे विशेष. गावातील सर्व जातीपातीच्या, धर्माच्या व राजकारणाच्या भिंती बाजूला सारत गुलाबवाडी गाव एकजुटीने आपलं हे छोटं खेडं आदर्श करण्याकडे वाटचाल करीत आहेत.
सुरुवातीला गावातील अनेकांचा या उपक्रमाला विरोध होताच.. परंतु सर्वांना गुरुजींची गुलाबी गाव ही आगळी वेगळी संकल्पना कळाल्यावर मात्र आज सर्वांनी एकजुटीने या कार्यात हिरीरीने सहभाग घेऊन गावातून ५०० रुपये प्रति कुटुंब लोकवर्गणी जमा करत लोकसहभागातून आदर्श गुलाबी गाव तयार करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
२५ डिसेंबर रोजी परम पूज्य ब्रम्हलीन संत लक्ष्मण चैतन्यजी बापू यांच्या पुण्यतिथी निमित्त गुलाबवाडी या गावाला जिल्ह्यातील पहिले ‘पिंक व्हिलेज’ बनवून पूज्य बापूजींना पुण्यतिथी निमित्त सर्व गुलाबवाडीकर मोठ्या श्रद्धेने श्रद्धांजली वाहणार आहेत. पूज्य बापूजींचा सुद्धा गुलाबी रंग अत्यंत आवडीचा होता. आपल्या बापूजींच्या आश्रमाच्या सर्व चैतन्य साधक परिवाराच्या गणवेशाचा रंगही गुलाबीच आहे. अशा विविधांगी आदर्श बाबी समोर ठेवून गुलाबवाडी हे गाव विकासाच्या दिशेने पुढे येतेय..!