जळगावात शंभर रुपयांसाठी शस्त्रधारी गुंडांचा घरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:31 PM2017-11-27T23:31:09+5:302017-11-27T23:36:55+5:30
फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपये दिले नाही म्हणून ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर २५ ते ३० जणांच्या सशस्त्रधारी टोळक्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता घडली. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२७ : फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपये दिले नाही म्हणून ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर २५ ते ३० जणांच्या सशस्त्रधारी टोळक्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता घडली. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ललित चौधरी या तरुणाने एका फायनान्सच्या माध्यमातून मोबाईल घेतला होता. त्याचा हप्ता एक हजार ७०० रुपये होता. हा हप्ता घेण्यासाठी प्रविण चंद्रकांत वाघ हा आला असता ललित याने दुपारी एक हजार सहाशे रुपये दिले व त्यातील शंभर रुपये बाकी ठेवले होते. त्यामुळे या कर्मचाºयाचा ललित याच्याशी वाद झाला. त्यानंतर प्रविण वाघ हा रवी भोई, धनराज कोळी, आबु भालेराव, मोनुसिंग बावरी, संदीप वारुळे, शुभम सपकाळे, दर्शनसिंग टाक, किरण गव्हाणे, प्रेमसिंग टाक, अविनाा नन्नवरे, अश्विन सोनवणे, निखिल बडगुजर व भैय्या भोई यांच्यासह ८ ते १० जण घेऊन सायंकाळी ललित याच्या घरी आला. या टोळक्याने थेट कुटुंबावर हल्ला चढविला. ही गर्दी पाहून मदतीला धावून आलेल्या अभिषेक व राकेश या दोघांवर जमावातील टोळक्याने तलवार हल्ला केला तर ललित याची बहिण पल्लवी कांचन येवले, दक्ष येवले (वय ५), स्वरा (२) व पत्नी भूमिका आदींनाही दुखापत झाली.
एकाचा प्रकृती चिंताजनक
या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिषेक याची प्रकृती चिंताजनक असून त्याला जिल्हा रुग्णालयातून खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे तर राकेश याच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
घरातील सामानाची नासधूस
या टोळक्याने घरातील सामानाची नासधूस केली असून घराच्या खिडक्या, कुलर, पलंग, पाण्याचा इलेक्ट्रीक पंप व सायकलची तोडफोड केली आहे. या टोळक्याच्या दहशतीमुळे कुटुंब भयभीत झाले आहे.
अन् मोठी दुर्घटना टळली
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, शरद भालेराव, विजय नेरकर व किशोर पाटील यांना तत्काळ घटनास्थळी रवाना केले. पोलीस आल्याचे पाहून टोळक्याने तेथून पळ काढला. दरम्यान, पोलीस पोहचले नसते तर एखाद्याचा खूनच झाला असता असे गल्लीतील लोकांनी सांगितले.
पोलिसांनी धरपकड मोहीम सुरु केल्यानंतर मुख्य आरोपी प्रविण हा हाती लागला. अन्य संशयितांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. दरम्यान, याप्रकरणी संगिता विकास चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.