बेसमेंट प्रकरणी कारवाईसाठी गुप्ता यांचा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:43+5:302020-12-08T04:13:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील अनधिकृत बांधकामाचा शोध घेऊन बेसमेंटचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करून पार्किंगसाठी जागा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील अनधिकृत बांधकामाचा शोध घेऊन बेसमेंटचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. उपायुक्त संतोष वाहुळे यांनी आठवडाभरात कायदेशीर अभ्यास करून धोरण निश्चित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानतंर गुप्ता यांनी आंदोलन मागे घेतले.
जळगाव शहरात विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुले बांधण्यात आली आहे. मात्र या व्यापारी संकुलात येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहने लावण्यासाठी अधिकृत जागेची व्यवस्था जळगाव महानगरपालिकेने केलेली नाही. पर्यायाने वाहनधारकांना आपल्या ताब्यातील वाहने थेट रस्त्यावर लावण्याची वेळ येते. त्यामुळे शहर पोलीस वाहतूक शाखेकडून वाहनधारकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी संकुलाच्या बेसमेंटचा अनधिकृत वापर होत असल्याने पार्किंगला जागा मिळत नाही. त्यामुळे पालिकेने ३६ बांधकामे सील करून ती निष्कासित करावी तसेच पार्किंगची व्यवस्था करावी. ९६ प्रकरणांत तत्काळ निर्णय द्यावा, १३३ प्रकरणांत अनधिकृत बांधकामांचा शोध घ्यावा घेऊन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच महापालिकेने बेसमेंटचा अनधिकृत वापर करून पार्किंगसाठी जागा न सोडणार्या संबंधितांचे बांधकामे सील करून निष्कासित करावी या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या आंदोलनास बसले. दोन ते तीन तासानंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांनी त्यांची भेट घेतली. तसेच शहरातील बेसमेंटमधील अनधिकृत वापर झालेल्या जागांच्या उर्वरित प्रकरणांमध्ये नगररचना विभाग सर्वेक्षण करून सुनावणीअंति सकारण आदेश पारित करण्यात येतील. तसेच पारित झालेल्या आंदेशाबांबत, आयुक्त, उपायुक्त, सहायक संचालक, नगररचना, विधी सल्लागार, यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून धोरण निश्चित करण्यात येईल. तसेच या कार्यवाहीबाबत आपणास अवगत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दीपककुमार गुप्ता यांना देण्यात आले. यानंतर गुप्ता यांनी आंदोलन मागे घेतले.