बुरशीयुक्त शेवया खाण्यायोग्यच्या अहवालाने जळगाव जिल्हा परिषदेच्या सभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:07 PM2018-09-01T13:07:25+5:302018-09-01T13:12:16+5:30
‘काळाबाजार’ झाल्याच्या संशयाने सदस्यांचा तीव्र संताप
जळगाव : बुरशीयुक्त शेवयांचा विषय गेल्या काही सभांमध्ये गाजत असताना या शेवयांबाबतचा अहवाल आज शुक्रवारच्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला असता सारे सभागृह अवाक झाले. या शेवया खाण्यायोग्य असल्याचा आश्चर्यजनक अहवाल शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्याने संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई करणे उचित ठरणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान बुरशीयुक्त शेवयांचा अहवाल असा आलाच कसा ? याबाबत सदस्यांमध्ये शंका उपस्थित तर झालीच परंतु या विषयावर प्रचंड गदारोळही झाला.
ही सभा जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील व रजनी चव्हाण तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे यांची मुख्य उपस्थिती होती. सुमारे ५ तास चाललेल्या या सभेत शिलाई मशीन योजना, अधिकाऱ्यांची ठेकेदारी, समान निधी वाटप आदी विषयही जोरदार गाजले.
यादीत असलेल्या कामास मंजुरी नाकारली
समाजकल्याण विभागाच्या निधीतून हायमास्ट लॅम्पची कामे करण्याचा विषय अजेंड्यावर होता मात्र या कामास मंजुरी नाकारुन परियोजनेला मान्यता सत्ताधारी गटाने दिली. यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. एकीकडे कामाच्या यादीत उल्लेख असताना ते काम नाकारले तर दुसरीकडे डीपीडीसीच्या विविध विभागाच्या निधी खर्चासाठी कामाची यादी सादर न करता निधी खर्चास मंजुरी देण्यात येते याबाबत नाराजी व्यक्त केली.
काही शाळांची विजेची थकबाकी असल्याने त्या ठिकाणी डिजीटल करण्यास अडचण निर्माण होत असल्याने लालचंद पाटील यांंनी मुद्दा मांडला की, लातूर जि.प.ने अशी थकबाकी संबंधित ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून भरावी असा निर्णय घेतला आहे.
खराब शेवयांना चांगले ठरवणाºयांना लखवा होईल !
खराब शेवयांना चांगले म्हणून मुलांच्या जिवाशी खेळले जात आहे. देव त्यांना माफ करणार नाही. त्यांना लखवा होईल, अशा शब्दात रावसाहेब पाटील यांनी संताप व्यक्त केला. मुलं मेल्यानंतर गुन्हा दाखल झाला असता काय? असा सवालही त्यांनी केला. यानंतर नाना महाजन यांनी या विषयातील अपयशाने पदाधिकारी व अधिकारी या सर्वांसाठीच शरमेने मान खाली घालावी अशी स्थिती निर्माण झाल्याचे खेदाने नमूद केले.
‘त्या’ शेवयांचे नुमनेच झाले गायब
बुरशीयुक्त शेवयांचा अहवाल ‘त्या’ खाण्यायोग्य असल्याचा अहवाल आल्यामुळे इतर नमुने कोठे आहेत असा सवाल गोपाळ चौधरी यांंनी विचारला असता बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी आपल्याकडे कोणतेही नमुने नसल्याचे सांगितले. पल्लवी सावकारे, शशिकांत साळुंखे, जयपाल बोदडे, प्रभाकर सोनवणे आदी इतर चार-पाच सदस्यांनीही याबाबत आवाज उठवून तडवी यांच्यावर नमुने गायब केल्याचा आरोप केला व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली असता ती मागणी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मान्य केली. दरम्यान ते नुमने आता असते तर इतर ठिकाणी ते तपासणीसाठी पाठविता आले असते, असे सदस्य यावेळी म्हणाले.
अहवाल ‘मॅनेज’ झाला की नमुनेच चांगले पाठवले ?
अंगणवाडीत वाटप झालेल्या बुरशीयुक्त शेवयांची पाकीटे आधीच्या एका सर्वसाधारण सभेत सादर केली असताना या शेवयांचा अहवाल त्या खाण्यायोग्य आलाच कसा? अशी शंका सदस्यांनी उपस्थित केली. एक तर अहवाल मॅनेज झाला किंवा तपासणी साठी प्रयोगशाळेत नमुने चांगल्या शेवयांचे पाठविले? असा शंकेचा सूर यावेळी उमटला.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची प्रतिमा लावणार
धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान परिवाराचे श्रद्धास्थान डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची प्रतिमा जिल्हा परिषदेत लावण्याच्या ठरावासही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.