गुरू नेहमी तुमचे जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी मदत करतात - अद्वैत दंडवते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:15 PM2019-07-16T13:15:39+5:302019-07-16T13:16:05+5:30
गुरू म्हणून जे बोलतो ते कृतीत आणले तरच इतरांचा विश्वास बसतो
जळगाव : गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा असते़ गुरू ही कोणी एक व्यक्ति नसते, तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्ति भेटत असतात जे तुमच जगणे अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यास मदत करतात, असे विचार अनाथांसाठी आनंदघर हा उपक्रम राबविणारे अद्वैत दंडवते यांनी मांडले़ गुरूपौणिर्मेच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते़
दंडवते यांनी सांगितले की, कामाच्या प्रेरणेच्या बाबतीत सांगायचे झाले तर महात्मा गांधी यांच्या जीवनातून खरी प्रेरणा मिळाली़ त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांमधून गांधीजी कसे जगले, असे खूपच कमी लोक असतात जे स्वत:वर टीका करू शकतात, गांधीजी त्यातील एक होते़ गांधीजी नेहमी सांगायचे ज्यावेळी तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल, द्विधा मनस्थितीत असाल तर नेहमी आर्थिक दुर्बल अशा व्यक्तिचा चेहरा डोळ्यासमोर आणा, आपण जे करणार आहोत त्यामुळे त्याच्या जीवनात काही बदल होणार आहे का, हा विचार प्रेरणादायी होता़ त्या विचारातूनच कचरा वेचक मुलांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आनंद घर च्या माध्यमातून यामुलांचे जगणे आनंदी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो़
जे आपण बोलत ते आपल्या कृतीत येते का हे बघणे अतिशय महत्त्वाचे आहे़ माझ्या मुलांसाठी सुद्धा तोच आदर्श असावा, मी जे बोलतो ते कृतीत येते का हे ते पाहाता व त्यादृष्टीनेच त्यांचा माझ्यावर विश्वास असतो, गुरूंसाठी हे महत्त्वाचे आहे़
जगण्याचा मार्ग शोधायला मदत
गुरू हा केवळ शिक्षण व्यवस्थेतूनच तुम्हाला मिळतो असे नाही, अनेक लोक तुमच्या आजुबाजूला असतात जे तुम्हाला जगण्याचा मार्ग शोधायला मदत करतात़ गुरू तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत असतात, असे अद्वैत दंडवते यांनी सांगितले़