गुरुजींचा मार्चचा पगार मे महिन्यात खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:38+5:302021-05-14T04:16:38+5:30

एप्रिलचा पगार थकीत : काही महिन्यांपासून शिक्षकांचा पगार वेळेवर होईना ! लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून ...

Guruji's March salary on account in May | गुरुजींचा मार्चचा पगार मे महिन्यात खात्यावर

गुरुजींचा मार्चचा पगार मे महिन्यात खात्यावर

Next

एप्रिलचा पगार थकीत : काही महिन्यांपासून शिक्षकांचा पगार वेळेवर होईना !

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार अवेळी होत आहे. तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मार्च महिन्याचा पगार नुकताच शिक्षकांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र, एप्रिल महिन्याचा पगार अजूनही थकीत आहे. पगाराला विलंब होत असल्यामुळे शिक्षकांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार एक तारखेला करावेत, या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षकांकडून अनेकवेळा शासनाला निवेदने दिली गेलीत तर अनेक वर्षांपासून आंदोलने सुध्दा केली जात आहेत. मात्र, शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्‍यात येत आहे. सध्या जिल्हा परिषद शिक्षकांचा पगार एक ते दोन महिने उशिराने होत आहे. दुसरीकडे कोरोना रोखण्यासाठी शिक्षकांची सुध्दा मदत घेतली जात आहे. त्यात शिक्षकांचा सुध्दा कोरोनामुळे मृत्यू आहे. आधीच गंभीर परिस्थिती असताना, पगार विलंबाने होत असल्यामुळे शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे साडे सात हजार जिल्हा परिषद शिक्षक आहेत. याचा शिक्षकांचा तब्ब्ल दीड महिन्यानंतर मार्च महिन्याचा पगार खात्यावर नुकताच जमा झाला आहे. एप्रिल महिन्याचा पगार कधी होणार याची प्रतीक्षा आता शिक्षकांना लागू आहे. अनेकांचे घराचे हप्ते थकले आहेत, त्यामुळे पगार वेळेवर व्हावेत, अशी मागणी करण्‍यात आली आहे.

शालार्थ अपडेट करावे...

शालार्थ प्रणाली अपडेट न केल्यामुळे तिचा वापर केवळ बजेट मागणीसाठीच होत आहे. व सीएमपी प्रणाली राज्यात कुठेही कार्यान्वित नसल्यामुळे बजेट देवूनही वेतनास विलंब होत आहे. सीएमपी प्रणालीचा वापर केल्यास शिक्षकांचा पगार हा एक तारखेलाच खात्यावर जमा होईल, त्यामुळे ही प्रणाली तात्काळ लागू करण्यात यावी, अशी मागणी सुध्दा शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.

काय म्हणतात शिक्षक.....

जिल्हा परिषद शिक्षकांचे पगाराला दरमहा उशीर होत आहे. दोन महिन्यांनी पगार होत आहे. वास्तविक शासनाने दोन वर्षांपासून पगारासाठी शालार्थ योजना सुरू केली. ऑनलाईन प्रक्रिया झाल्याने पगार वेळेवर होतील अशी शिक्षकांना आशा होती. मात्र उलट पगार उशिरा होऊ लागले. शिक्षकांना दरमहा मुलांच्या शिक्षणाची फी, गृहकर्जाचे हफ्ते भरावे लागता. त्यातच कोरोना आजाराने सर्व आर्थिक गणित बिघडले आहे. अक्षयतृतीया, रमजान ईद यासारखे महत्वाचे सण असूनही पगार नसल्याने उसनवारी करावी लागत आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करून पगार वेळेवर करावे ही अपेक्षा आहे. प्रशासनाने लक्ष घालून किमान यापुढे तरी पगार वेळेवर वेळेवर करावेत.

- डॉ. विजय बागुल, अध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघ

-------------------

शिक्षकांचे वेतन दरमहिन्याच्या १ तारखेला करण्यात यावे. याबाबत अनेक शासन निर्णय, परिपत्रके आजवर निर्गमित झाली आहेत. मात्र यांची अंमलबजावणी आजवर कधीही झालेली नाही. सध्याची वेतन प्रक्रिया अत्यंत कालबाह्य, वेळखाऊ असल्याने कधी एक महिना तर कधी दोन दोन महिने शिक्षकांचे वेतन हे उशीरा होत आहे. त्यामुळे जिल्हयातील शिक्षक हा हवालदिल झाला आहे. वेतनातील ही दप्तर दिरंगाई दूर करण्यासाठी शिक्षकसेना सी.एम.पी. वेतन प्रणाली लागू करण्याचा आग्रह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार आहे.

- संदीप पवार, जिल्हा कार्याध्यक्ष, शिक्षकसेना

-----------------

जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, एक ते दोन महिने वेतन विलंबाने होत असल्याने शिक्षकांचे इतर तथा गृहकर्जाचे हप्ते थकीत होऊन दंड लागत आहेत. त्यामुळे सीएमपी प्रणालीचा वापर केल्यास अदा होणारी रक्कम प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर जमा होईल. परिणामी, शिक्षकांच्या वेतनास होणारा विलंब टळेल आणि शिक्षकांचे वेतन हे १ तारखेलाच जमा होऊ शकते.

- सोमनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती ---------------

जिल्हा परिषद शिक्षक

- ७,५०० (सुमारे)

-----------------------------

एकूण शिक्षक

- २४,५०० (सुमारे)

-------------------------------------------

शिक्षकांचा मार्च महिन्याचा पगार नुकताच झाला आहे. त्यासोबत सेवानिवृत्तांचे वेतन सुध्दा अदा करण्यात आले आहे. एप्रिल महिन्याचा पगार लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे.

- बी.एस.अकलाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

Web Title: Guruji's March salary on account in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.