भुसावळात जप्त केला गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:42+5:302021-06-11T04:11:42+5:30
भुसावळ : गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर राज्यात शासनाने बंदी केली असली तरी कोरोना लाॅकडाऊन काळामध्ये चढ्या भावाने शहरामध्ये ...
भुसावळ : गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर राज्यात शासनाने बंदी केली असली तरी कोरोना लाॅकडाऊन काळामध्ये चढ्या भावाने शहरामध्ये गुटख्याची तस्करी तसेच विक्री होताना दिसून येत आहे. शहरातील डिस्को टॉवरजवळील महालक्ष्मी प्रोव्हिजनजवळील मोकळ्या जागेतून बुधवारी बाजारपेठ पोलिसांनी हजारो रुपये किमतीचा गुटखा जप्त केला, दरम्यान संशयित आरोपी जागेवरून पसार झाला. अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक अनिल मोरे, एएसआय गयासोद्दीन शेख, हवालदार संजय भदाणे, संजय पाटील, समाधान पाटील यांना बाजारपेठेत गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. महालक्ष्मी प्रोव्हिजनजवळ पार्सल आल्यानंतर पोलिसांनी ते ताब्यात घेतल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात विमल गुटखा आढळला. संशयिताने मात्र यावेळी धूम ठोकली.
रात्री उशिरापर्यंत गुटख्याची मोजणी सुरू असल्याने नेमका किती रुपयांचा गुटखा पकडला याची माहिती कळू शकली नाही. दरम्यान, ग्रामीण भागामध्येही गल्ली-बोळामध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणात चढ्या भावाने विक्री होत आहे. एखाददोन वेळा कारवाई होते व त्यानंतर स्थिती ‘जैसे थे’ होते. कारवाईत सातत्य असणे आवश्यक असून, संबंधितांचा शोध घेऊन गुन्हे दाखल होण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.