एमआयडीसीत पकडला १४ लाखाचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:41 PM2020-07-14T12:41:21+5:302020-07-14T12:41:34+5:30
जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजता छापा टाकला. त्यात १३ लाख ६८ ...
जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजता छापा टाकला. त्यात १३ लाख ६८ हजार १२० रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा मालक विजय मिश्रा याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
एमआयडीसीत एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना मिळाला होती. त्यावरुन ही धडक कारवाई करण्यात आली.
अधिकाऱ्यांनाच फक्त कारवाईचे ठिकाण व स्वरुप माहिती होते, त्यामुळे सोबत असलेल्या पथकातील कोणालाच त्याची माहिती देण्यात आली नव्हती. पथकाला थेट गोदामावर नेण्यात आल्यावर कारवाई करण्यात आली. चौकशीत हे गोदाम व साठा विजय मिश्रा (रा.शाहू नगर) यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली.
या कारवाईत सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम व पोलीस अधीक्षकांचे वाचक सिध्देश्वर आखेगावकर, सहायक फौजदार चंद्रकांत पाटील, रवींद्र घुगे, महेश महाजन, किरण चौधरी, दर्शन ढाकणे यांच्यासह सहायक फौजदार विनयकुमार देसले, सुनील चाधरी, अशोक फुसे, प्रवीण पाटील, जमील खान, रवींद्र पाटील, भूषण मांडोळे, आसिफ पिंजारी व भरत डोळे यांचा समावेश आहे.
गुटख्यातून कोट्यवधीची उलाढाल सट्टा, दारु यासह गुटख्याची अवैध विक्री शहरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परराज्यातून कंटेनर भरुन गुटखा शहर व परिसरात आणला जात आहे. तेथून सकाळी ५ ते ७ या वेळेत लहान वाहनातून गुटखा किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहचविला जात आहे.