बोदवड जि.प.शाळांमधील शिक्षकांचे वर्गणी करुन ‘ज्ञानदीप अभियान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:42 PM2017-12-03T12:42:42+5:302017-12-03T12:44:17+5:30
शिक्षक घेताहेत ‘शोध नैपुण्याचा’
चुडामण बोरसे
जळगाव - ज्ञान दिल्याने ज्ञान हे वाढत असते... हे ब्रीद घेऊन बोदवड (जि. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने ‘शोध नैपुण्याचा’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यासाठी शिक्षकांनी वर्गणी गोळा करुन दोन पुस्तकांची निर्मिती केली आहे.
चांगला विद्यार्थी आणि चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षक काय करु शकतात, याचे एक आदर्श उदाहरण बोदवडच्या शिक्षकांनी उभे केले आहे.
आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. भविष्यात आपला विद्यार्थी या आव्हानाला यशस्वीपणे सामोरा जावा आणि मुख्य म्हणजे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि या परीक्षांची तयारी इयत्ता पहिलीपासून व्हावी, यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. ‘ज्ञानदीप अभियान’ असे या अभियानाचे नाव देण्यात आले आहे. आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व क्षमता याची शिक्षकांना माहिती असते. यासाठी शिक्षकांनीच स्वत:च अभ्यासक्रम तयार केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या द्ृष्टीने पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाशी सांगड घालून या ज्ञानरचनावादी पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.
असे आहे अभियान
या अभियानात बोदवड तालुक्यातील सर्व जि.प. शाळा शाळांमधील इ.१ ली ते इ.७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्वत:चा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. सर्व शाळांमधून अधिकाधिक विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील, यासाठी अतिशय माफक दरात पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी गरज पडल्यास शिक्षकांचे प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे.
अभियानाची वैशिष्ट्ये
इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टॅलेंट सर्च, आॅलिंपियाड, ब्रेन डेव्हलपमेंट यासारख्या परीक्षांचा सराव पहिलीच्या वर्गापासूनच व्हावा, यासाठी या शिक्षकांचे प्रयत्न सुरु आहेत. आजकाल कर्मचारी ते जिल्हाधिकारी पदापर्यंतची निवड ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होते. ग्रामीण भागातील शाळांमधील मुलांना ही संधी मिळावी आणि शिक्षकांचाही गुणवत्ता विकास व्हावा, यासाठी शिक्षकांनी मिळून हा उपक्रम सुरु केला आहे.