ज्ञानोबा, तुकोबांची मराठी महाराष्ट्रातून हद्दपार होता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:31 AM2019-07-01T11:31:26+5:302019-07-01T11:33:23+5:30

रामदास फुटाणे : मातृभाषा टिकविणे ही साहित्यिक, लेखक, दिग्दर्शकांची जबाबदारी

Gyanoba, Tikobas should not be exiled from Maharashtra | ज्ञानोबा, तुकोबांची मराठी महाराष्ट्रातून हद्दपार होता कामा नये

ज्ञानोबा, तुकोबांची मराठी महाराष्ट्रातून हद्दपार होता कामा नये

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : ‘आजोबा नाचू लागले....आजी नाचू लागली, शेंबडी नातवंडे इंग्रजी वाचू लागली, नातू नाचू लागला....नात नाचू लागली, रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली, अजान मुळाखाली माती खचू लागली, इंद्रायणीच्या डोहात पोथी टोचू लागली...’ अशी मराठीची अवस्था सध्या महाराष्ट्रात होऊ पाहत असल्याने मराठीचा बळी देऊन इंग्रजी घरात येऊ नये, असे स्पष्ट मत हास्य कवी, चित्रपट कथालेखक, दिग्दर्शक, वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केला. या सोबतच कोणत्याही स्थितीत ज्ञानोबा, तुकोबांची ही मराठी महाराष्ट्रातून हद्दपार होऊ नये, ही जबाबदारी साहित्यिक, लेखक, दिग्दर्शकांची असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
जळगावातील व.वा. जिल्हा वाचनालयाच्या १४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी फुटाणे हे जळगावात आले होते. त्या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी मराठी भाषा टिकविण्यासह आजची बदलती शिक्षण पद्धती,स्वरुप यासह राजकीय स्थिती यावर टीकाटिप्पणी केली.
मराठी सक्ती केली, वटहुकूम कधी काढणार
सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत मराठीची सक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नंतर मुख्यमंत्र्यांनी इयत्ता दहावीपर्यंत मराठी सक्ती केली खरी, मात्र आता शाळा तर सुरू झाल्या आहेत, या बाबतचा वटहुकूम कधी काढणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाचन संस्कृती कमी झाल्यामुळे तरुणांची मानसिक दुर्बलता वाढली आहे व मातृभाषेकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र हीच मातृभाषा जगण्याचे बळ देते, त्यामुळे ती टिकलीच पाहिजे.
मराठीसाठी कसदार निर्मिती हवी
हिंदी भाषेचा प्रचार हिंदी विद्यापीठापेक्षा हिंदी चित्रपटांनी अधिक केला. अशाच प्रकारे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे सर्व चित्रपट बंगाली भाषेत होते, तरी प्रत्येक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकले. याला कारण म्हणजे कसदार कलाकृती. मराठीचाही अधिकाधिक प्रचार-प्रसार होण्यासाठी मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी संगीत कसदार असेल तर ते आपसूकच सर्वत्र पोहचेल. अशाच प्रकारे दर्जेदार साहित्य निर्मिती झाल्यास मराठी साहित्याचे वाचकही वाढतील. पुस्तके वाचल्याने निर्णय क्षमता वाढते, त्यामुळे आजच्या तरुणाईला वाचनाची गोडी लावणे गरजेचे असल्याचे फुटाणे यांनी सांगितले.
‘सतत घर बदलणाऱ्याला गृहनिर्माण मिळाले....’
सध्याच्या राजकारणाविषयी व राज्यकर्त्यांच्या शालेय धोरणाविषयी बोलता-बोलता रामदास फुटाणे यांनी त्यांच्या ‘सुरुवात’ या कवितेतील ‘तज्ज्ञ पाहूनच खातेवाटप महाराष्ट्राला कळाले, सतत घर बदलणाºयाला गृहनिर्माण मिळाले, अनैतिक राजकारणाची ही खरी सुरुवात आहे, उद्याच्या स्फोटाची पेटलेली वात आहे...’ या पंक्ती सांगत त्यातूनच बदलत्या स्थितीचे वर्णन केले.
मराठी जोडाक्षराची भीती बाळगणारे इंग्रजी संस्कृतीचे कौतूक करू लागले
साहित्य, संस्कृतीची मोठी परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातच मराठी जोडाक्षराची भीती बाळगणारे इंग्रजी संस्कृतीचे कौतुक करू लागले आहेत. ही स्थिती म्हणजे ‘जोडाक्षरे टाळा नवा पोरखेळ आहे, देव अधिक इंद्र म्हणा.... महाराष्ट्रावर वेळ आहे, सत्त्याहत्तर नको आता सत्तर अधिक सातचं पुस्तक, इंग्रजांच्या औलादीचं अभ्यासक्रमात मस्तक...’ अशी असल्याचे त्यांनी आपल्या ‘बाल भारती’ या कवितांच्या ओळीतून सांगितले. राज्यकर्त्यांकडून मराठी भाषा टिकणार नाही, ही जबाबदारी साहित्यिक, लेखक, चित्रपट दिग्दर्शकांची असेही ते म्हणाले. इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी भाषा हद्दपार होऊ पाहत असताना राज्यकर्त्यांनी आणलेली संख्या शिकविण्याची पद्धतही चुकीची असल्याचे त्यांनी नमूद केले.
साहित्य संमेलनाच्या निम्म्या अध्यक्षांना कोणी ओळखत नाही
मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतर मराठी वाचविण्याची भाषा केली जाते. साहित्य संमेलनातच यावर आवाज का उठविला जात नाही, या प्रश्नावर बोलताना फुटाणे म्हणाले की, गेल्या दशकभरातील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पाहिले तर त्यातील निम्म्या अध्यक्षांना कोणी ओळखत नसेल व त्यांचे साहित्यही कोणी वाचले नसेल. ते केवळ नशिबाने अध्यक्ष झाले. पूर्वी महाराष्ट्रात साहित्याचा जो दबदबा होता, तोदेखील आता राहिलेला नाही. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनातून मराठीबाबत आवाजही उठत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Gyanoba, Tikobas should not be exiled from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.