‘हातभट्टी’ निर्मिती, वाहतूक करणारी ‘चौकडी’ जाळ्यात; तीन दुचाकी, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By विजय.सैतवाल | Published: December 9, 2023 01:13 AM2023-12-09T01:13:15+5:302023-12-09T01:13:50+5:30
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव व पिलखोड येथे गिरणा नदीकाठी हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री सुरू असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली.
जळगाव : गिरणा नदीकाठावर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्या चार जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करीत तीन दुचाकी, १६० लिटर गावठी हातभट्टी दारू, रसायन असा एकूण दोन लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत चौघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी करण्यात आली.
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव व पिलखोड येथे गिरणा नदीकाठी हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री सुरू असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव व चाळीसगाव निरीक्षकांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवून सदर ठिकाणी हातभट्टीवर छापा टाकला. तेथे चार जण गावठी हातभट्टी दारू निर्मिती व वाहतूक करताना आढळले. त्यांच्याकडून तीन दुचाकींसह १६० लिटर गावठी हातभट्टी दारू, ३५०० लिटर रसायनसह एकूण दोन लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यात सायगाव येथील विजय हिलाल सोनवणे, रमेश वामन माळी, किरण भास्कर दळवी व सुरेश जुलाल सोनवणे यांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे निरीक्षक सी.एच. पाटील, चाळीसगाव निरीक्षक आर.जे. पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रतिकेश भामरे, मुकेश पाटील यांनी केली.