गारपीट व वादळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:00+5:302021-03-21T04:16:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ...

Hail and stormy rains cut the grass of the farmers | गारपीट व वादळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांचा घास

गारपीट व वादळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांचा घास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचेही प्रचंड नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. गारपिटीसह वादळी पावसामुळे दादर, गहू ही पिके भुईसपाट झाली आहेत. इतर अनेक भागांमध्ये केळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा करण्याचे ठरवलेले दिसून येत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आव्हाने, शिरसोली, दापोरा, वडली, वावडदा, फुपनगरी, खेडी, भोकर, कठोरा, भादली या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वाऱ्याचा वेगही तब्बल ४० किमी प्रति तास असल्याने, अवघ्या तासाभराचा पावसातच गहू व दादरचे पीक भुईसपाट झाले आहे. रब्बीची पिके ऐन काढणीवर असतानाच, शनिवारी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खरिपानंतर रब्बी हंगामही गेला वाया

गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरिपाची भर रब्बी हंगामात काढू, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, ऐन कापणीवर आली असतानाच, निसर्गाने केलेल्या थैमानामुळे आता रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाडली, वावडदा भागात गारपीट

तालुक्यातील वडली, वावडदा, बिलवाडी या भागांत गारपीटही झाली आहे. यामुळे हरभऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागांमध्ये सर्वाधिक फटका बसला असून, ७०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हसावद भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आकाशात ढगांची गर्दी होताच शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

शेतांमध्ये सर्व पिके ऐन काढण्यावर असतानाच, शनिवारी सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी करताच, शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाआधीचा गहू, हरभरा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून मशिने शेतात दाखल करून पीक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आव्हाणे, फुपनगरी, खेडी या भागांत अचानक पावसाला सुरुवात झाल्याने, काढलेला माल शेतातच ओला होताना शेतकऱ्यांना पाहावा लागला. कृषी विभागाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Hail and stormy rains cut the grass of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.