जळगाव जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 09:40 PM2020-03-17T21:40:53+5:302020-03-17T21:41:00+5:30
चोपडा रस्त्यावर वृक्ष पडले : लिंबूच्या आकाराच्या गारमुळे रब्बी हंगाम झोपला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात मंगळवार १७ रोजी दुपारी साडे चार वाजेपासून अवकाळी पाऊस व गारपीटला सुरुवात झाली. यामुळे रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे.
बोदवड शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वादळ व त्या पाठोपाठ गारांचा पाऊस झाल्याने बाजारपेठत पळापळ झाली. या पावसाने गहू, हरभरा, मक्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच ऐनपूर व विवरा परिसरात देखील वादळी पाऊस झाला.
जामनेर तालुक्यातील तळेगावसह परिसरात अवकाळी पावसासह गारपीट व वादळी वाºयामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे गहू, हरभरा, मका वादळी वाºयासह गारपीट झोडपल्याने मोठे नुकसान झाले. टरबूज शेतीचेही प्रमाणात नुकसान झाले आहे. पहूर येथे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजरी लावली. तर अमळनेर येथेही पावसाने हजेरी लावली. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
चोपडा तालुक्यात संध्याकाळी लिंबूच्या आकाराची गारपीट झाली.लासूर, गणपूर, चोपडा, माजवड, बिडगाव, अडावद, धानोरा परिसरात वादळी पाऊस झाला. वेले ते चोपडा सुतगिरणी रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली. तर चोपडा यावल बापू डेअरीजवळ झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावलसह दहिगाव येथे रात्री वादळी पाऊस झाला. तर रावेर, चांगदेव, पाडळसे परिसरात देखील वादळी पाऊस झाला.
धुळे जिल्ह्यात लिंबूच्या आकाराची गार
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान अधार्तास वादळी वाºयासह गारपीट झाली. लिंबूच्या आकाराच्या गारपीटमुळे शिरपूर शहरातील काही घरांच्या खिडक्यांचे काचदेखील फुटले .