अर्धा तास दुकानात थांबून जळगावात चोरट्याने लांबविला ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 03:18 PM2018-12-11T15:18:35+5:302018-12-11T15:20:43+5:30
अंगात जॅकेट, डोक्यात टोपी व तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्याने ख्वॉजामिया दर्गा परिसरातील युनिटी चेंबरमधील सदगुरु कृपा मोबाईल हे दुकान फोडून त्यातील ३३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, सात हजार रुपये किमतीचे मोबाईल अॅसेसरीज व १० हजार ५०० रुपये रोख असा ५० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
जळगाव : अंगात जॅकेट, डोक्यात टोपी व तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्याने ख्वॉजामिया दर्गा परिसरातील युनिटी चेंबरमधील सदगुरु कृपा मोबाईल हे दुकान फोडून त्यातील ३३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, सात हजार रुपये किमतीचे मोबाईल अॅसेसरीज व १० हजार ५०० रुपये रोख असा ५० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
दरम्यान, पहाटे ४.४० वाजता चोरटा दुकानात शिरला आहे तर ५.१० वाजता तो चोरी करुन दुकानाच्या बाहेर पडला आहे. तब्बल ३० मिनिटे चोरटा दुकानात होता. त्याची प्रत्येक हालचाल दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुकान मालक विकास काशिनाथ मराठे (वय ३४, रा.जुना खेडी रोड, जळगाव) यांनी जिल्हा पेठ पोलिसांकडे तक्रार दिली. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे सादर केले.
चोरट्याने सर्वात आधी शटरचे दोन कुलुप टॅमीने तोडले आहेत. त्यानंतर दुकानात शिरल्यावर काचेच्या दरवाजाचे कुलुप तोडले. प्रत्येक ड्रावर तपासून त्याने १० हजार ४०० रुपये रोख काढले त्यानंतर तीन मोबाईल काढून बॅगेत टाकले. या दुकानात तीन लाखाच्यावर साहित्य होते, मात्र त्याने मोबाईल, रोकड व मोबाईल संबंधित अॅसेसरीज लांबविले आहे. ईश्वर महाजन यांची नाश्त्याची गाडी दुकानाच्या बाहेर लागते. सोमवारी सकाळी सात वाजता ते गाडी लावत असताना शटर अर्धवट दिसले व कुलुप तुटलेले होते. त्यांनी लागलीच विकास मराठे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मराठे यांनी दुकानात येऊन सामान, मोबाईल व रोकड तपासली असता गायब होती.