महाविकास आघाडी सरकारमधील निम्म्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:47+5:302021-05-30T04:13:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मराठा आरक्षण आमच्या सरकारने मंजूर केले होते, मात्र नंतर महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यात ...

Half of the ministers in the Mahavikas Aghadi government oppose reservation | महाविकास आघाडी सरकारमधील निम्म्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध

महाविकास आघाडी सरकारमधील निम्म्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मराठा आरक्षण आमच्या सरकारने मंजूर केले होते, मात्र नंतर महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यात कमी पडल्याने हे आरक्षण नाकारण्यात आले. यावर आता चर्चा होत असून छत्रपती संभाजीराजे भोसले हे आमच्या पक्षाचे आहेत, ते मराठा आरक्षणासंदर्भात येत्या ७ जून रोजी काय भूमिका मांडतात, ते पाहूया, असे मत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

मोदी सरकारला सत्तास्थापनेस सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जळगाव जिल्हा भाजपच्यावतीने दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षण विषयी ७ जून रोजी भूमिका मांडू, असे वक्तव्य केले होते. या विशेष प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी हे भाष्य केले.

यावेळी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य सरकारचे अपयश

राज्यात भाजप सरकार असताना मराठा समाजाला परिपूर्ण असे आरक्षण देण्यात आले होते. आरक्षणाच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण बाजू तयार करण्यात आली होती. त्यानंतरच आरक्षण दिले गेले होते. उच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते. त्यावेळी सरकारने योग्य बाजू मांडल्याने ते आरक्षण टिकले होते. दुर्दैवाने आमचे सरकार गेले. त्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही. म्हणून आरक्षण गेले, असे गिरीश महाजन म्हणाले. आरक्षण नाकारण्यात आले, त्याला भाजप सरकार जबाबदार नाही. महाविकास आघाडी सरकारचे वकील न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले. म्हणूनच हे आरक्षण नाकारण्यात आले. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनादेखील आरक्षण कोणामुळे गेले हे माहित आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष राहणार आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.

निम्म्या मंत्रांचा आरक्षणाला विरोध

महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे असल्याने त्यांच्यात एकमेकांमध्ये मतभेद आहेत. मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री आरक्षणाला विरोध करतात. म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

मुक्ताईनगरातील पक्षांतराबाबत बोलणे टाळले

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भाजपच्या चार नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता गिरीश महाजन यांनी याविषयी बोलणे टाळत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

दिव्यांग बांधवांना मदत

कोरोनामुळे सर्वच घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन दिव्यांग बांधवांना भाजपच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

Web Title: Half of the ministers in the Mahavikas Aghadi government oppose reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.