जळगावात सुवर्ण बाजारात उलाढाल निम्म्यावर
By admin | Published: July 2, 2017 11:37 AM2017-07-02T11:37:56+5:302017-07-02T11:37:56+5:30
‘जीएसटी’ लागू झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट : दाणाबाजारात फक्त 10 टक्के व्यवसाय इलेक्ट्रॉनिक दुकाने, मॉलमध्येही परिणाम
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.2 - वस्तू व सेवा कर शनिवार, 1 जुलैपासून लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या कराचा परिणाम शहरातील बाजारपेठांवर दिसून आला. सुवर्ण बाजार व डाळ उद्योगातील उलाढाल निम्म्यावर आली होती, तर दाणा बाजारात केवळ 10 टक्केच उलाढाल झाल्याची माहिती व्यापा:यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
30 जून रोजी मध्यरात्री देशभरात वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंच्या भावांवर परिणाम झाला. वस्तूंवर कर लागू होणार असल्यामुळे काही वस्तू या महाग होतील यामुळे जळगावातील अनेक इलेक्ट्रॉनिक व कपडय़ांचा दुकानावर शुक्रवारी ग्राहकांनी मध्यरात्रीर्पयत गर्दी केली होती. मात्र वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर शनिवारी शहरातील बाजारपेठांमधील व्यवहार मंदावले. ग्राहकांनीही बाजारपेठेकडे पाठ फिरविली होती.
सुवर्ण बाजाराकडे ग्राहकांची पाठ
सुवर्ण बाजारावर मोठा परिणाम झालेला दिसून आला. सोन्याच्या किमतीत सध्यातरी वाढ झाली नसली तरी पहिल्या दिवशी सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला. काही दालनांमध्ये अत्यल्प ग्राहक दिसून आले.
शुक्रवारी झालेल्या उलाढालीच्या तुलनेत सोने खरेदीत शनिवारी 50 टक्क्यांची घट झाल्याची माहिती महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी यांनी दिली. तसेच जीएसटी लागू होणार असल्यामुळे व्यापा:यांनी त्यासाठीची सर्व तयारी केली होती. शनिवारी ग्राहकांना जीएसटी प्रणालीची बिले देण्यात आली.
डाळींच्या दरात कोणतीही वाढ नाही
अन्न-धान्यावर आधी कोणताही कर लागू नव्हता. मात्र आता पहिल्यांदाच ब्रॅण्डेड धान्यावर कर लागू झाल्यामुळे धान्य महाग होणार आहे. मात्र पहिल्या दिवशी दाणाबाजारात ब्रॅण्डेड धान्याचे दर स्थिर होते. जून-जुलै महिना हा मंदीचा समजला जातो. या काळात मोठी उलाढाल होत नसते. त्यामुळे वस्तू व सेवा कर प्रणालीचा परिणाम दाणाबाजारावर झाला नसला तरी ऑगस्ट महिन्यानंतर अन्न-धान्य व्यवसायावर मोठा परिणाम जाणवेल, असे प्रवीण पगारिया म्हणाले.