निम्मे शेरी गाव सहा महिन्यांपासून ‘अंधारात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:18 PM2019-05-30T18:18:24+5:302019-05-30T18:19:01+5:30
नागरिकांमध्ये संताप : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवूनही बऱ्याच दिवसांपासून कार्यान्वित नाही
पहूर : जामनेर तालुक्यातील शेरी गावातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला, मात्र अद्यापही तो कार्यान्वित करण्यात आला नाही. यामुळे गावाचा काही भाग सहा महिन्यांपासून अंधारात आहे.
पहूर गावापासून तीन कि.मी. अंतरावर शेरी हे गाव आहे. या गावात नेहमी विजेचा प्रश्न निर्माण होत होता. यासाठी सहा महिन्यांपूर्वी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. मात्र ट्रान्सफॉर्मर सुरू झाला नाही. यासंदर्भात सरंपच मीरा सटाले यांनी वेळोवेळी पहूर येथील वीजवितरण कार्यालयाचे सहायक अभियंता संजय सरताळे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तक्रार दिली आहे. मात्र सरताळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गावातील विद्युत तार बदलविण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सरताळे यांच्याकडे पत्र दिले आहे. या पत्राचीही दखल घेतली नसल्याचे सरंपच मीरा सटाले यांनी सांगितले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.
यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला सरपंचांनी भ्रमणध्वनीवर संपर्क करून समस्या सांगितली असता ठेकेदार तुळशीराम सटाले यांनी माहिती दिली की, पालघर येथून ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यासाठी कर्मचारी पाठविले असून यासाठी साहाय्यक अभियंता यांच्याकडे परमिट घेण्यासाठी गेल्यावर त्यांनी परमिट दिले नाही. त्यामुळे आलेले कर्मचारी काम न करता रिकाम्या हाताने रवाना झाले .