एका हाताने आकारते पोळी, संकटांना ‘तिने’ दिली टाळी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:08 AM2019-03-08T00:08:08+5:302019-03-08T00:09:41+5:30

राधा पाडवींचा संघर्ष प्रवास प्रेरणादायी

A hand-shaped slip, the girl was confronted with her ...! | एका हाताने आकारते पोळी, संकटांना ‘तिने’ दिली टाळी...!

एका हाताने आकारते पोळी, संकटांना ‘तिने’ दिली टाळी...!

Next

जिजाबराव वाघ
चाळीसगाव - परिस्थितीचा वेदनादायी दाह...अगोदरच संकटांनी वेढलेले आयुष्य...नवऱ्याला दारुचं व्यसन जडलेले, कसेबसे सावरत असतांनाच उजवा हातच निकामी होतो...तरीही ‘त्या’ खंबीरपणे उभ्या राहतात. एका हाताने पोळीला आकार देतांनाच आपल्या संसारालाही सुबक आकार देतात. धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील मेस मध्ये कुक असणा-या ‘राधा किशोर पाडवी’ यांनी संकटांना टाळी देऊन आयुष्याच्या वाटेवर इतरांसाठी प्रेरणेची अशी ठसठशीत मोहोरच कोरलीयं.
बोदर कलमाडी हे शहादा तालुक्यातील राधा पाडवींचे तीनशे उंबऱ्यांचं गाव. नावावर जमिनीचा तुकडा असला तरी तो गहाण पडलेला. कामाच्या शोधात राधा आणि त्यांचे पती किशोर धुळ्यात येतात. काही काळ चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे त्या मावशी सोबत शेतीचे कामही करतात.
मोलमजुरी करुन गुजराण करीत असतांना २०११ मध्ये धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात त्या कुक म्हणून रुजू होतात. १२ वी उत्तीर्ण असणाºया राधा यांना मोठाच आधार मिळतो. २०११ ते २०१७ अशी सात वर्ष राधा आणि किशोर यांचा संसार काहीसा स्थिरस्थावर होत असतांना पुन्हा एक जीवघेणे संकट फणा काढून उभे राहते.
पिठाच्या गिरणीत ‘हाताचे’ तुकडे
प्रशिक्षण केंद्राच्या मेस मध्ये राधा पाडवी दरदिवशी साडेचार हजार पोळ्या यंत्राच्या सहाय्याने तयार करतात. विजपुरवठा खंडीत असला की, हेच काम हाताने करावे लागते. यासाठी येथे पिठाची गिरणीही असून २०१७ मध्ये गहु दळत असतांना त्यांचा उजवा हात गिरणीत अडकतो. क्षणर्धात खांद्यापर्यंत हाताचे अक्षरश: तुकडे होतात. एकुणच त्यांच्या कुटूंबावर कोसळलेला हा आघात जीवघेणा असतो. नोकरीवर गदा येऊन परिवाराची हातातोंडाची गाठ कशी पडायची ? हे प्रश्नचिन्ह राक्षसासारखे झालेले.
मेस ऐवजी दुसरे काम मिळावे यासाठी राधा यांची धडपड सुरु होते. अर्थात यात शिक्षणाचा अडसर उभा राहतो. त्यामुळे संकटाला भिडण्याशिवाय राधा यांच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. याकाळात पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आणि आता चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलिस अधिक्षक असलेले प्रशांत बच्छाव आणि त्यांच्या पत्नी स्मिता बच्छाव त्यांना सावरतांनाच नव्या स्वप्नांसाठी उभारी देतात.
अन् एका हाताने पोळीला आकार
मोलमोजरी करणाºया आणि व्यसनी पतीच्या संसाराला साथ देतांना राधा यांच्या पदरात असणा-या दोन मुलींच्या पालनपोषणाचाही प्रश्न असतोच. त्यांची एक मुलगी तिसरीत तर दुसरी पहिलीत शिकते. आपल्या मुलींच्या भविष्यात अशी परवड नको म्हणून राधा यांनी दोघी मुलींना इंग्रजी माध्यम असणा-या शाळेत घातले आहे. डाव्या हाताने मेस मधील सर्व कामे करतांना पोळीला देखील आकार द्यायचा आणि संघषार्ने संकटाला नमवायचे. असा निश्चय करुन राधा पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसात डाव्या हाताने सर्व कामे करण्याचे कसब त्यांनी आवगत केले. सद्यस्थितीत डाव्या हाताने यंत्राच्या सहाय्याने पोळ्या लाटण्यासह भाजण्याचे कामही त्या सफाईने करतात. वीज पुरवठा खंडीत असतांना चुलीवर पोळ्याही शेकतात.
आजमितीस डाव्या हाताने त्यांनी आपल्या कोलमडू पाहणाºया संसाराला सावरले असून त्या खरोखरच उजव्या ठरल्या आहेत. राधा पाडवी यांचा हा प्रवास म्हणूनच आजच्या पठडीबाज पुरुषसत्ताक पद्धतीसह महिलांसाठीही प्रेरणेची नवी गुढी उभारणारा ठरतो. अबला ते सबला असा धगधगीत अध्याय देखील गिरवतो.
संकटे कधी समोरुन येतात. तर कधी चोरपावलांनी येऊन आव्हान देतात. मी उन्मळून पडण्याआधीच सावरले. खडतर काळात प्रशांत व स्मिता बच्छाव यांनी लढण्याची उर्जा माज्यात रुजवली. मेस मधील सर्व सहका-यांनी धीर दिला. महिलांनी आपल्यातील नारीशक्तिला जागृत ठेवले तर कोणत्याही संकटावर आपल्या जिंकण्याचा ठसा कोरता येतो. एवढे मात्र खरेच.
- राधा किशोर पाडवी, कुक, पोलीस प्रशिक्षण केंद्र मेस, धुळे.

Web Title: A hand-shaped slip, the girl was confronted with her ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव