प्रश्नपत्रिका हाताने लिहिण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:23 PM2018-05-02T13:23:44+5:302018-05-02T13:27:05+5:30
सागर दुबे
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशनच्या पेपरला चक्क चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने काही वेळातच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या़ मात्र प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य चकीत झाले. चक्क हाताने लिहीलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाली़ हाताने प्रश्नपत्रिका लिहिण्याची वेळ येणे हे उमविकडून अपेक्षीत नाही़ दरम्यान, चुकीची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कारवाईची अभाविपने मागणी केली होती़ त्यावर देखील काही हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत़ विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने लक्ष देण्याची गरज आहे़
प्रश्नपत्रिका चुकीची असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसाय झाली़ निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे पाचोरा, जामनेर तसेच जवळपास गावातील होती़ त्यामुळे रात्री साडेसात वाजता पेपर सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी गाडी मिळणे मुश्किल झाले होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती़ आता अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू होणार आहेत़ त्यासाठी विद्यापीठ प्रशासन कसे नियोजन आखणार याकडे सर्वांचे लक्ष आहे़ सूर्य आग ओकत असताना काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून पेपर सोडवावे लागत आहे़ विद्यार्थी हितासाठी विद्यापीठाने महाविद्यालांमधील सुविधांची पाहणी सुध्दा करण्याची गरज आहे़
दुसरीकडे विद्यापीठ आवारातील मुला-मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर समस्या सिनेट सदस्यांकडे विद्यार्थ्यांनी मांडल्या़ त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पाणी व विजेची समस्या असल्याचे समोर आले़ याबाबत सिनेट सदस्य कुलगुरूंची चर्चा करणार आहे़ मात्र, विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरविण्यात कमी पडत असल्याचे चित्र यातून दिसून येते़ आता यावर विद्यापीठ काय दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी चांगले अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यात येत असतात़ परंतू, किरकोळ चुकांमुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते़