काँग्रेस - राष्ट्रवादीचे हात शेतक-यांच्या रक्ताने माखलेले : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:13 PM2018-04-07T17:13:25+5:302018-04-07T17:13:25+5:30
चाळीसगावच्या कृषि महोत्सवात विरोधकांवर हल्लाबोल
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विधानभवनाच्या प्रांगणात शेतमाल विक्रीचा बाजार भरवला गेला. १५ वर्षात काँग्रेस - राष्ट्रवादीने शेतक-यांना लुटण्याचे एकमेव काम केले. त्यांचे हात शेतक-यांच्या रक्ताने माखले असल्याचा आक्रमक हल्लाबोल करीत कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
चाळीसगाव येथे चार दिवसीय कृषि महोत्सव, शासकीय योजनांची जत्रा, ४३वे विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमांचे उदघाटन शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्व, उत्तमराव पाटील विचार मंचावर जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, पं.स.सभापती स्मितल बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपसभापती संजय पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना सदाभाऊ खोत यांनी शासनाचे लोककल्याणकारी निर्णय, योजना उपस्थितांसमोर मांडल्या. कांदा उत्पादक शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून ८० टक्के कांदा चाळींना पूर्व संमती देण्यासह ११ एप्रिल पर्यंत आॅनलाईन पद्धतीने शेतक-यांचा हरभरा, तूर खरेदी केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. खरेदी केलेले कडधान्य साठविण्यासाठी खासगी गोडावूनही आरक्षित करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
मागच्या कार्यकाळात सिंचन कमी आणि पैसा आडवा, पैसा जिरवा. हाच उद्योग केला गेला. मात्र गेल्या साडे तीन वर्षात सरकारने जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे राबविल्याने १६ हजार गावे टँन्करमुक्त झाली आहेत. त्यांनी कृषि महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करतांनाच राज्यातील हा पथदर्शी उपक्रम असल्याचे गौरवदगारही काढले.
वरखेडे - लोंढे धरण दोन वर्षात पुर्ण होईल - गिरीष महाजन
वरखेडे - लोंढे धरणाला आघाडी सरकारच्या कार्यकाळात फक्त ३३ कोटी रुपये मिळाले. गेल्या साडे तीन वर्षात या धरणासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. धरणाला नुकतीच केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली आहे. यामुळे बळीराजा सन्मान या केंद्रीय योजनेत समावेश झाल्याने ५०० कोटी रुपयांचा सुधारीत आराखडा मंजुर झाला आहे. त्यामुळे २०१९ पूर्वीच हे धरण पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गिरणेवरील सात बलून बंधा-यांचे काम महिन्याभरात सुरु होणार आहे. यासाठी आवश्यक असणारा जलआराखडा मंजुर झाला आहे. बलून बंधा-यांमुळे गिरणा बाराही महिने खळाळणार असून चाळीसगाव तालुका दुष्काळमुक्त होईल, असेही महाजन यांनी सांगितले. चाळीसगाव शहरासाठी ७१ कोटीची सुधारीत पाणी पुरवठा मंजुर झाली आहे. भूयारी गटारी योजनेचा प्रस्ताव दाखल करा. यासाठी लागणारे १६० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित हा उपक्रम राज्यासाठी आदर्श आहे. एकाच छताखाली शेतकरी, अधिकारी, मार्गदर्शक, तंत्रज्ञ, विद्यार्थी - शिक्षक आणणे ही अभिनव कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.
अडीच लाख लोकसंख्येला फायदा : आमदार उन्मेष पाटील
कृषि महोत्सव, योजनांची जत्रा आणि विज्ञान प्रदर्शनातून चाळीसगाव तालुक्यातील अडीच लाख जनतेला फायदा होणार असल्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. १५२ शासकीय योजनांची माहिती, राज्यभरातील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग, कृषि तंत्रज्ञान, शेतक-यांना मार्गदर्शन, योजनांचे लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत शासन पोहचणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी आदर्श शेतक-यांना यावेळी गौरविण्यात आले.
खासदार एस.टी.पाटील, आमदार स्मिता वाघ यांचीही भाषणे झाली. सुत्रसंचालन प्रा. डॉ. किरण गंगापुरकर यांनी केले. आभार स्मितल बोरसे यांनी मानले.