हॅण्डस् अप? छे, छे, व्हॉटस् अप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:34 PM2018-07-20T23:34:11+5:302018-07-20T23:34:35+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात प्रसिद्ध साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांनी लिहिलेले स्फूट...
आमच्या लहानपणी म्हणजे, आम्ही प्राथमिक शाळेत असताना, म्हणजे मोहंजोदारो, हरप्पाच्या काळाच्या थोड्याशा अलिकडच्या काळात, शाळेत गुरुजी आम्हाला निबंधासाठी एक विषय हमखास देत असत, ‘यंत्र हे शाप की वरदान’ विज्ञान हे तारक की मारक ‘बैलगाडी श्रेष्ठ की मोटारगाडी.’ अर्थात हा मागासलेला काळ म्हणजे पाषाणयुग नुकतेच संपल्याचा काळ असावा. कारण पाषाणयुगाच्या शिल्लक असलेल्या खुणा अजूनही आमच्या दप्तरात होत्या. पाटी पेन्सील ह्या जोडगोळीतील पेन्सील ही ढिसूळ दगडापासून बनविलेली, तर पाटी ही टणक दगडापासून बनविलेली असे. त्यामुळे ती फुटतही असे. पुढे प्रगती झाली आणि जाड पुठ्ठ्यावर डांबर फासून केलेल्या पुठ्ठ्याच्या पाट्या आल्या. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला बग्यान मारलं, त्याच्या बापाचं मी काय खाल्लं’ अशा मधूर, आर्त कविताचं सृजनही थांबलं. पाटीचा आणि शाळेचा संबंध ‘गुरुजींनी शाळेत पाट्या टाकणे,’ एवढ्या पुरताच मर्यादित झाला.
धुळपाटीपासून सुरू झालेला प्रवास, विद्यार्थ्यांजवळ असलेल्या वैयक्तिक संगणकापर्यंत येऊन पोचल्यावर, ‘विज्ञान हे शाप की वरदान’ हा तेव्हा निबंधाचा विषय आठवण्याचं कारण काय? आहे, आहे, त्या शापातून बाहेर कसं पडावं, ह्या महाभिषण संकटात मी सापडलोय. ह्या विज्ञानाचं एक अपत्य भ्रमणध्वनी उर्फ सेलफोन, आणि त्यावर अवतरलेली ही व्हॉटस्अप नावाची संमोहिनी! आपल्या तोंडासमोर हिला धरून ठेवल्याशिवाय आबालवृद्धांना चैन पडत नाही. हिचं संमोहनच असं की एका सेकंदाचा हिचा विरह भल्याभल्यांना सहन होत नाही. जे काय बघायचं, जे काय समजून घ्यायचं ते व्हॉटस्अपवरुनच. दिसतंय हे चित्र तसं दिसतंय...
चकित राजा सांगतो की, मी ‘व्हॉटस्अप’वर पाहिले,
राज्य गेले, क्रांती झाली, मी ‘व्हॉटस्अप’वर पाहिले.
आसनाच्या खालती सुरुंग त्यांनी पेरला की,
पाय हे धरून वरती, मी ‘व्हॉटस्अप’वर पाहिले.
मारले पाकीट त्याने मागच्या मागे माझे,
चोरताना त्या चोराला मी ‘व्हॉटस्अप’वर पाहिले.’
अप्सरा स्वर्गातूनी स्वप्नात गेली येऊनी,
माझ्यासवें सेल्फीत तिला ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
‘ऐकले तुम्हास’ ऐसे कोणीही ना सांगतो,
सांगतो जो तो हसुनी, ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
मास्तरांचा हात धरूनी पोरगी माझी पळाली,
धावताना आपटलेली, ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
बायको करणार निश्चित आज शेपूचीच भाजी,
‘मेजवानीत’ करपलेली, ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
बायकोने ‘झिंग’ माझी मैत्रिणीत शेअरिंगली.
जात असता तोल माझा ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
कानास ना, नयनास जे श्रोता म्हणोनी मानते,
गीत ऐसे क्रांतीकारी ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
सर्व शांत सुरळीत होते, दंगल तर नव्हती कुठे,
तरीही तिला पेटलेली ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
आभासी जगतात ह्या चमत्कारही होती किती,
हिमनदीला पेटलेली ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
चोरावर रोखून पिस्तुल उभ्या अशा इन्स्पेक्टरला
व्हॉटस्अप असे दरडावताना ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
पसरवू नका अफवा असे ‘व्हॉटस्अप’वरती वाचले,
तीही अफवा पसरताना ‘मी व्हॉटस्अप वर पाहिले.’
बायकोशी बोलण्याला वेळ कोणाला असे हो,
‘बाप झालो’, वृत्त हेही ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
संपली ‘यात्रा’ मला हे समजले उशिरा जरासे,
होत असता राख माझी, ‘मी व्हॉटस्अप’वर पाहिले.’
-प्रा.अनिल सोनार, धुळे