एटीएममध्ये ठणठणाट
By admin | Published: March 13, 2017 12:54 AM2017-03-13T00:54:30+5:302017-03-13T00:54:30+5:30
सलग सुटय़ांचा फटका : बँकांची उदासीनता, ग्राहकांचे प्रचंड हाल
भुसावळ : सलग आलेल्या तीन दिवसीय सुटय़ांमुळे शहरातील जवळपास सर्वच एटीएम केंद्रातील रोकड संपल्याने ग्राहकांना मोठे हाल सोसावे लागत आह़े राष्ट्रीयकृत व खासगी बँकांकडून रोकड टाकण्याबाबत एकूणच असलेल्या उदासीनतेमुळे ग्राहकांचे व्यवहार खोळंबले, तर शहरातील अपवादात्मक बँकांनी मात्र ग्राहकांची गैरसोय होऊ दिली नाही़
शहरातील सुमारे 10 वर बँकेच्या एटीएममध्ये शनिवारपासून रोकड संपल्याने ग्राहकांना फिरफिर करावी लागत आह़े शनिवारी व रविवारी आलेली सुटी, तर सोमवारी होळी-रंगपंचमीनिमित्तदेखील सुटी असल्याने सलग सुटय़ांचा ग्राहकांना मोठा फटका बसला आह़े जवळपास सर्व बँकांमधील एटीएममध्ये रोकड नसल्याने ग्राहकांच्या संतापात अधिक भर पडली़
दहा बँकांच्या एटीएममध्ये रोकड नाही
शहरातील जामनेर रोडवरील जवळपास सर्वच एटीएम केंद्रांवरील रोकड संपल्याने ग्राहकांना अन्य भागात धाव घ्यावी लागली़
या एटीएममध्ये ठणठणाट
पांडुरंग टॉकीज चौकातील बँक ऑफ इंडियाचे, अॅक्सिस बँकेचे, तसेच जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेट्रोल पंपावरील एटीएममधील रोकड संपली आहे, तर उत्तर भागातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील एसबीआय, आयडीबीआय, वसंत टॉकीज परिसरातील बडोदा बँक, विठ्ठल मंदिर वॉर्डातील महाराष्ट्र बँक, न्यू एरिया वॉर्डातील आयडीबीआय बँक, जामनेर रोडवरील इको बँक, पंजाब नॅशनल बँकांच्या एटीएममध्ये रोकड नसल्याने ग्राहकांना मोठाच मनस्ताप सोसावा लागला़
नोटाबंदीनंतरही दिलासा नाही
शनिवारी व रविवारी आलेल्या सलग सुटय़ा, तर सोमवारी धूलिवंदननिमित्त सुटी आल्याने ग्राहकांनी एटीएमचा अधिक वापर केला़ मुळात नोटाबंदीपासून अनेक बँकांनी एटीएम सुरू करण्याबाबत उदासीनता दर्शवल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत़
ऑनलाइन व्यवहारांसाठी दोन टक्के जादा भरुदड
पंतप्रधानांनी ऑनलाइन व्यवहारावर जादा भर दिला असला तरी शहरात मात्र ग्राहक ऑनलाइन व्यवहार करण्याबाबत एकूणच नाखुश आहेत़ साध्या औषधी दुकानावर पाचशे रुपयांची औषधी घ्यावयाची म्हटल्यास त्यामागे दोन टक्के अधिकचा जादा चार्ज द्यावा लागतो. हीच गत मोबाइल दुकानांसह अन्य व्यवहारांना लागू पडत आह़े दुकानदारांच्या मते खासगी बँका त्यांच्याकडून या ट्रान्झक्शनसाठी त्यांना रक्कम आकारतात. त्यामुळे त्यांना नाइलाजाने ग्राहकांकडून दोन टक्के चार्ज घ्यावा लागतो़
दोनच एटीएम सुरू
4 शहरातील जामनेर रोडवरील एचडीएफसीसह स्टेट बँक मुख्य शाखेचे एटीएम सुरू असल्याने ग्राहकांना दिलासा आहे. मात्र हे एटीएम रात्री बंद राहत असल्याने गैरसोय होत आह़े