जळगावात शुभेच्छांनी होणार नाताळाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:02 PM2018-12-21T17:02:22+5:302018-12-21T17:05:18+5:30
प्रभू येशूंनी सांगितलेला शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश आणि त्यासोबत घरोघरी नाताळच्या शुभेच्छा देऊन ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाला शुक्रवारी सुरुवात होत आहे.
जळगाव : प्रभू येशूंनी सांगितलेला शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश आणि त्यासोबत घरोघरी नाताळच्या शुभेच्छा देऊन ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाला शुक्रवारी सुरुवात होत आहे. शहरातील तिन्ही चर्चमध्ये ख्रिसमसची जय्यत तयारी करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाईने चर्च सजले आहेत.
अवघ्या चार दिवसांवर नाताळ सण आल्याने, रामानंदनगर येथील सेंट फ्रान्सिस डी फेल्स चर्च, मेहरुण येथील थॉमस चर्च व पांडे डेअरी चौकाजवळील अलायन्स चर्च या ठिकाणी ख्रिसमस साठी जोरदार तयारी सुरु आहे. तिही चर्चमध्ये आठवडाभर दररोज वेगवेगळ््या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आजपासून चर्चच्या परिसरातील घरोघरी लहान मुले मेणबत्ती भेट देऊन, नाताळच्या शुभेच्छा देणार आहेत.
येशूंचे गाणे म्हणून देणार शुभेच्छा
ख्रिश्चन बांधवांचा पवित्र सण मानल्या जाणाऱ्या नाताळ उत्सवासाठी समाज बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. २५ रोजी नाताळ असल्याने प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाच्या स्वागतासाठी लहान मुले चर्चच्या परिसरातील नागरिकांच्या घरोघरी आजपासून शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहे.अलायन्स चर्चयेथील लहान मुले शिवाजीनगर, दुध फेडरेशनमार्गे पिंप्राळा मार्गे घराघरी जाऊन नाताळच्या शुभेच्छा देणार आाहेत. सेंट फ्रान्सिस डी फेल्स चर्चमधील मुले रामानंदनगर व महाबळ परिसरात शुभेच्छा देणार असून, मेहरुण येथील थॉमस चर्च मधील मुले मेहरुण परिसरात घरोघरी जाऊन शुभेच्छा देणार आहेत.
घरोघरी फराळाचा सुगंध
दिवाळी प्रमाणे ख्रिश्चन बांधव नाताळ सण साजरा करत असतात. यासाठी प्रत्येक घरी चकली, करंजी, लाडू, डोनस आदी विविध गोड पदार्थ तयार केले जातात. नाताळाच्या एकमेकांच्या घरी गोडपदार्थ पाठवून, नाताळाच्या शुभेच्छा दिल्या जातात.एकमेकांना घरी फराळाला बोलावले जात असल्याने सध्या घरोघरी फराळ बनविण्याची जय्यत तयारीदेखील सुरु आहे.