सखी-सखीतलं हितगूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 05:39 PM2019-05-07T17:39:53+5:302019-05-07T17:40:09+5:30
नंदुरबार येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक प्रा.सविता पटेल यांनी अक्षय तृतीयेनिमित्त सखी-सखीतले हितगूूज मांडण्याचा केलेला प्रयत्न...
अक्षय तृतीयेसंदर्भात अनेक लोककथा, लोकसमज, आख्यायिका आपणास लोकसाहित्यातून तसेच धार्मिक ग्रंथातून वाचावयास मिळतात. कुणबी लोक या सणास ‘आखाजी’ म्हणतात तर गुजर लोक या सणास ‘आखात्री’ या नावाने संबोधतात.
अक्षय तृतीयेच्या दिवशी नांगराच्या फाळाला किंवा वखराच्या पासला सोन्याची अंगठी घासून सकाळी औताला बैल जोडून अंगणात उभे करतात. घरधनीण त्यांची पूजा करते. गूळ व धन्याचा प्रसाद देऊन औत शेतात किमान पाच फेऱ्या लावण्यासाठी नेतात. शेतीकामाला मंगल प्रार्थना करून आराधना करण्यात शेतकरी समाज धन्यता मानतो. फळांचा राजा आंबा असल्याने आमरस पुरणाची पोळी जेवणाचे महत्त्व या दिवशी आहे. गुजर समाजात यासाठी ‘सवाष्ण’ (गोळन्यो) जेवू घालण्याचीदेखील पद्धत आहे. बºयाच समाजात कलश व डांगर पूजनाचे महत्त्वदेखील अबाधित आहे. चार मातीचे ठोकळे ठेवून त्यावर माठाची स्थापना करून डेरगं भरण्याची प्रथा आहे. जमलेले सर्व घरातील मंडळी बोटाचा स्पर्श करतात आणि माठाच्या हालचाली पाहून या वर्षी किती पाऊस येईल याचा अंदाज लावतात. गुजर समाजात ५० वर्षांपूर्वी अक्षय तृतीयेला कोणीही पाहुणा कोणत्याही नातेवाइकाकडे मुक्कामी जायचा नाही, अशी पद्धत होती. आज मात्र तसे मानले जात नाही. एक-दोन तासात महत्त्वाचे काम असल्यास पाहुणा म्हणून जाऊ शकतात. याचे दुसरे कारण असे की ‘गजरानू’ परिसरातील गावे ही तासाभराच्या अंतरावर आहेत. त्यामुळे आपले काम आटोपल्यावर सायंकाळपर्यंत आपल्या घरी परत येऊ शकतात. पूर्वी वाहनांची कमतरता असल्याने ही पद्धत रूढ होती व म्हणून सणासुदीला कोणाकडे जात नसत. आखाजीला सखी-सखीतलं हितगुज मांडायचे. हमखास खात्रीचे (खातरी) श्रद्धास्थान म्हणजे कडुनिंबाला हेलकावणाºया आखाजीच्या झोक्यासोबत स्त्री मन मोकळे होते हे एका गुजरी लोकगीतातून स्पष्ट होते.
मारा पियरणो वाडो वाडानो लिंबडो लिंबडानो हिचको सखीनो गराडो पछि सु गावानो संसारणो पवाडो आखात्री आखात्री आय आखात्रीणी वात।
गयी आखात्री कणतीन हू देखी रहती वाट।
याप्रमाणे स्त्री मन हलके होते तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. नव्याने शेती करायचे तो हाच सुदिन मानून पूज्य मानला जातो. या सणाचे जसे सामाजिक महत्त्व आहे तसेच धार्मिक महत्त्वही तेवढेच आहे.
-प्रा.सविता पटेल, नंदुरबार