बाप्पाच्या आगमनाने जळगावाच्या बाजारपेठेत चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 10:06 PM2017-08-24T22:06:12+5:302017-08-24T22:07:38+5:30
आज स्थापना : वाहनबाजारात खरेदीला उधाण
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - बाप्पाच्या आगमनाने बाजारपेठेत उत्साह अन् चैतन्याचे वातावरण आहे. शुक्रवारी गणरायाची स्थापना होणार असल्याने गणेश मूर्तीसह विविध साहित्य खरेदीसाठी गुरुवारी दिवसभर बाजारपेठत प्रचंड गर्दी झाली होती. भर पावसातही गणेश भक्तांचा उत्साह कायम होता. या सोबतच वाहन, मोबाईल खरेदीला मोठा प्रतिसाद दिसून येत असून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 800 दुचाकी तर जवळपास 500 चारचाकी वाहने रस्त्यावर येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शुक्रवारी बाजारपेठेत आणखी गर्दी वाढणार आहे.
टॉवर चौक, बहिणाबाई उद्यान परिसर, अजिंठा चौक, गणेश कॉलनी, महाबळ स्टॉप आदी ठिकाणी गणेश मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदीसाठी गुरुवारी प्रचंड गर्दी झाली होती. दुचाकी, कार, एलईडी, मोबाईल यांना सर्वाधिक मागणी आहे.
800 दुचाकींची होणार विक्री
गणेश चतुर्थीच्या दिवशी दुचाकी खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती दिसून येत आहे. शहरातील एकाच दालनात 350 दुचाकींची बुकिंग झालेली असून शुक्रवारी या दुचाकींसह इतरही दालनातील मिळून एकूण 800 ते 900 दुचाकी विक्री होणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे.
यामध्ये मनपसंत वाहन मुहूर्तावर मिळण्यासाठी अनेकांनी आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. यासाठी गुरुवारी दालनांमध्ये मोठी गर्दी झाली होती.
दुचाकी पाठोपाठ चारचाकी वाहनांच्या खरेदीतही उत्साह आहे. शहरातील एकाच दालनात 350 चारचाकींची बुकिंग झाले आहे. मात्र एवढी वाहने उपलब्ध नसल्याने शुक्रवारी येथून केवळ शंभरच वाहने ग्राहकांना मिळणार आहे. इतर ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच शहरातील विविध दालनांमध्ये 500 वाहनांची मागणी आहे, मात्र तेवढय़ा प्रमाणात चारचाकी वाहनेच नसल्याचे चित्र आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गुरुवारीदेखील 30 ते 40 चारचाकी वाहनांची विक्री झाली. यासाठी दालनामध्ये मोठी गर्दी झाली होती.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात आज गर्दी वाढण्याची शक्यता
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात गुरुवारी पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे आज खरेदी कमी असली तरी शुक्रवारी खरेदी वाढण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. सध्या बाजारात एलईडी, मोबाईल यांना जास्त मागणी आहे.
गणरायाच्या पूजेसाठी लागणा:या साहित्यांना मोठी मागणी होती. यामध्ये नारळ 15 ते 20 रुपये प्रति नग, पाच फळे 20 रुपये, नागवेलीची 12 पाने 10 रुपये, सर्व पूजा असलेली पुडी व लाल कापड 20 रुपये, दुर्वा 5 रुपये जुडी या प्रमाणे पूजेचे साहित्य विक्री होत होते. गणपती मूर्ती घेतल्यानंतर त्याच परिसरात फिरस्ती करून विक्री करणा:यांकडून या वस्तूंची खरेदी केली जात होती.
बाप्पांच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर गणपतीच्या आवडत्या मोदकांना मागणी असून रेडिमेड मोदकांनी मिठाईची दुकाने सजली आहेत. यामध्ये तीन प्रकारच्या मोदकांचा समावेश असून त्यांना मागणी वाढली आहे. पूर्वी तसे घरीच मोदक तयार केले जात होते. मात्र आता घरगुती मोदकांसह तयार मोदकांनाही पसंती वाढली आहे. बाप्पाच्या आगमनाच्या पूर्व संध्येला हे मोदक खरेदीसाठी गर्दी झाली होती. सध्या बाजारात मावा, केशरी मोदक, मैदा व खोब:याचे मोदक, काजू मोदक उपलब्ध आहे. यामध्ये मैदा व खोब:याच्या मोदकांना जास्त मागणी आहे. यातील मावा मोदक दहाही दिवस उपलब्ध राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर इतर मोदक पहिल्या व शेवटच्या दिवसांसह मागणी नुसार उपलब्ध करून दिले जाणार आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. हा मुहूर्त साधण्यासाठी आमच्याकडे 350 दुचाकींची नोंदणी झाली आहे.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चारचाकींना मोठी मागणी आहे. आमच्याकडे 350 चारचाकींची बुकिंग असून वाहने कमी पडत आहे. चारचाकी खरेदीसाठी आजही मोठी गर्दी होती.
- उज्जवला खर्चे, व्यवस्थापक.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गुरुवारी पावसाचा परिणाम दिसून आला. शुक्रवारी खरेदी वाढण्याची शक्यता आहे. बाप्पाची कृपा चांगली राहील.
- नीलेश पाटील, विक्रेता.