मुलीच होतात म्हणून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:43+5:302021-01-15T04:14:43+5:30
जळगाव : ‘तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही’ या कारणावरुन विवाहितेचा छळ करणाऱ्या भंवरखेडा, ता.धरणगाव येथील पतीसह सहा जणांविरुध्द ...
जळगाव : ‘तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही’ या कारणावरुन विवाहितेचा छळ करणाऱ्या भंवरखेडा, ता.धरणगाव येथील पतीसह सहा जणांविरुध्द गुरुवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गितांजली उर्फ भावना संदीप चौधरी (२८,रा.कांचन नगर, जळगाव) या विवाहितेने फिर्याद दिली असून पती संदीप गोकुळ चौधरी, सासरे गोकुळ संपत चौधरी, सासू गंगुबाई, जेठ प्रभाकर, जेठानी सोनी प्रभाकर चौधरी (रा.भवरखेडा, ता.धरणगाव) व नणंद वर्षा दिनेश चौधरी (रा.डोंबिवली, जि.ठाणे) यांच्याविरुध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे.
अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
जळगाव : जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोकळ्या जागेत ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगावर जखमा आढळून आलेल्या आहेत. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र बागुल करीत आहेत.
शिरसोली येथे गावठी दारुचे रसायन पकडले
जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे देविदास हरचंद भील व विनोद पुना भील या दोघांकडे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ३७ हजार २५० रुपये किमतीचे गावठी दारु निर्मितीचे रसायन आढळून आले. दोघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीएआर प्रकरणात आज कामकाज
जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात विवेक ठाकरे याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी पुणे विशेष न्यायालयात कामकाज होणार आहे. बुधवारी बचाव पक्षाचा युक्तीवाद झाला. तो अपूर्ण आहे. शुक्रवारी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद होऊन जामीन अर्जावर निर्णय होऊ शकतो. महावीर जैन याच्या अर्जावरील दोन्ही बाजुने युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सरकारतर्फे ॲड.प्रवीण चव्हाण तर ठाकरे याच्यावतीने अॅड. उमेश रघुवंशी कामकाज पाहत आहेत.
मतमोजणी केंद्राची पोलिसांकडून पाहणी
जळगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा पेठचे निरीक्षक विलास शेंडे यांनी मतमोजणी केंद्राची गुरुवारी पाहणी केली. संध्याकाळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनीही गेट देऊन आढावा घेतला. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १८ रोजी मतमोजणी होणार आहे.