बायकोकडून होतोय छळ; कोरोनाकाळात ११० तक्रारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:16 AM2021-07-27T04:16:54+5:302021-07-27T04:16:54+5:30

जळगाव : पुरुषाकडून महिलेचा छळ असेच नेहमी ऐकले व वाचले जाते, मात्र बायकांकडूनही नवऱ्यांचे छळ होत असल्याचे किस्से ...

Harassment by wife; 110 complaints during Corona period! | बायकोकडून होतोय छळ; कोरोनाकाळात ११० तक्रारी !

बायकोकडून होतोय छळ; कोरोनाकाळात ११० तक्रारी !

Next

जळगाव : पुरुषाकडून महिलेचा छळ असेच नेहमी ऐकले व वाचले जाते, मात्र बायकांकडूनही नवऱ्यांचे छळ होत असल्याचे किस्से जळगाव जिल्ह्यात घडलेले आहेत. २०१८ ते जुलै २०२१ या साडे तीन वर्षाच्या कालावधीत ५१४ पुरुषांनी बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला साहाय्य कक्षाकडे केलेल्या आहेत. किरकोळ जरी वाद झाला तरी तो समजून न घेता बायका थेट माहेरी व पोलीस ठाणे गाठत असल्याची प्रकरणे समोर आलेली आहेत.

कोरोना काळात ११० जणांनी बायकोच्या विरुध्द तक्रारी केलेल्या आहेत.

जळगावच्या कक्षाकडे आलेल्या तक्रारीत सर्वात जास्त प्रकरणे हे सुशिक्षित लोकांचेच आहेत. अशिक्षित लोकांचे प्रकरण अगदीच नगण्य आहेत. महिलांच्या बाजूने कायदे अधिक असल्याने ही भावना मनात असते, त्यामुळे वादाच्या घटना अधिक असतात.

सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीत दिलेला आदेश हा अलीकडे पुरुषांसाठी दिलासा ठरलेला आहे. पूर्वी ४९८ च्या प्रकरणात अटक केली जायची, आता सात वर्षाच्या आतील शिक्षेच्या कलमातील कोणत्याच गुन्ह्यात अटक न करण्याचे आदेश दिल्याने हा दिलासा मिळाला आहे.

बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी

२०१८ -१४४

२०१९ -१७०

२०२० -१०४

२०२१ (१५ जुलै पर्यंत) -११०

मानसिक छळच नव्हे तर मारहाणही करते !

महिला साहाय्य कक्षाकडे आलेल्या तक्रारीनुसार अनेक प्रकरणात पती-पत्नीत इगो मोठे कारण ठरले आहे. अशिक्षितपेक्षा सुशिक्षित कुटुंबातच जास्त भांडणे झालेली आहेत. पती मारहाण करतो असे ऐकले असेल पण, येथे आलेल्या प्रकरणात तर पत्नीनेच पतीला झोडपून काढले आहे. मानसिक छळामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतींनी पत्नीच्या विरुध्द तक्रारी केलेल्या आहेत.

कोरोना काळात तक्रारी वाढल्या

कोरोना काळात सर्वाधिक तक्रारी वाढल्या आहेत. २०२० या वर्षभरात १०४ पुरुषांनी पत्नीच्या विरुध्द तक्रारी केल्या तर चालू वर्षी सात महिन्यात हाच आकडा ११० वर पोहचला आहे. म्हणजे वर्षभरात हा आकडा दुपटीने वाढू शकतो. २०१८ ते जुलै २०२१ या कालावधीत ५१४ पुरुषांनी पत्नीपासून होणाऱ्या छळाच्या तक्रारी केल्याची माहिती महिला कक्षाच्या अंमलदार सविता परदेशी यांनी दिली.

आर्थिक टंचाई आणि अति सहवास

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने कमाई कमी झाली. त्यामुळे पुढील सर्वच गणिते बिघडली. आर्थिक घडी विस्कटल्याने नैराश्य वाढले, वादविवाद कौटुंबिक हिंसाचार वाढला. कोणी व्यसनाकडे वळले, मात्र, तुम्ही कोणत्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता यावर सर्व अवलंबून असते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असल्या तरी अनेकांची कमाई या काळात वाढली, त्यामुळे दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

- डॉ. दिलीप महाजन, मानसोपचारतज्ज्ञ

पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?

जळगाव जिल्ह्यात पत्नी पीडित संघटना, पुरुष हक्क संघटना विविध ठिकाणी स्थापन झाल्या आहेत. या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी सदस्य हा लढा लढत आहेत. सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत. त्याशिवाय महिला म्हणून त्यांना सहानुभूती मिळते. पुरुषांसाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी स्थिती आहे. पोलिसांकडून देखील हीन वागणूक मिळते. प्रसारमाध्यमातून देखील पुरुषांच्या विरुध्द ठळकपणे प्रसिद्धी दिली जाते. बऱ्याचदा प्रकरण वेगळे असते व दाखल वेगळे असते. अशा परिस्थितीमुळे पुरुष खचतो आणि आत्महत्यासारख्या टोकापर्यंत पोहचतो. पुरुषांना सहानुभूती तर दूरच असते उलट त्यांना आरोपीच्या नजरेने बघितले जाते.

-एक पत्नी पीडित

Web Title: Harassment by wife; 110 complaints during Corona period!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.