सोशल मीडियावरही महिलांचा छळ; ‘सायबर’कडे १८ तक्रारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:16 AM2021-07-27T04:16:52+5:302021-07-27T04:16:52+5:30

जळगाव : तंत्रज्ञानामुळे सामान्य व्यक्तीही प्रगत होऊ लागला आहे. तंत्रज्ञानात सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम मानले जात आहे. ...

Harassment of women on social media as well; 18 complaints to cyber! | सोशल मीडियावरही महिलांचा छळ; ‘सायबर’कडे १८ तक्रारी !

सोशल मीडियावरही महिलांचा छळ; ‘सायबर’कडे १८ तक्रारी !

Next

जळगाव : तंत्रज्ञानामुळे सामान्य व्यक्तीही प्रगत होऊ लागला आहे. तंत्रज्ञानात सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम मानले जात आहे. मात्र हे तंत्रज्ञान महिलांसाठी घातक ठरू लागले आहे. काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेचे खासगी फोटो व्हायरल केल्याचे प्रकरण समोर आले. तर यापूर्वी अमळनेरच्या एका शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठविण्यात आला होता. या प्रकरणात संबंधिताला अटक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महिलांचा छळ होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परंतु, बदनामीच्या भीतीपोटी महिला तक्रार देत नसल्याचे समोर आले आहे.

अनोळखी व्यक्तीशी मैत्री होते. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. काही दिवसांनंतर मोबाइलवर अश्लील व्हिडिओ काढून महिलांचा छळ केला जातो. काहीजण महिलांकडे पैशांची मागणीदेखील करतात. जिल्ह्यात महिलांचा छळ झाल्याची तक्रार दाखल नसली, तरी बदनामीच्या भीतीपोटी महिला तक्रार देत नाही. जळगाव जिल्ह्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत.

सोशल मीडियाकडे आलेल्या तक्रारी

एकूण तक्रारी महिलांनी केलेल्या तक्रारी

२०१८ - १४ ०५

२०१९ - ५८ ०६

२०२० - २३ ०३

२०२१ (जुलैपर्यंत)१९ ०४

कुठल्या प्रकारचा होतो छळ

अ) नको त्या वेळी घाणेरडे मेसेज

ब) अश्लील व्हिडिओ पाठविणे

क) खासगी फोटो व्हायरल करणे

ड) अश्लील संदेश पाठविणे

अशी घ्या काळजी

शक्यतो अनोळखी व्यक्तीशी महिला व मुलींनी सोशल मीडियावर संपर्कच ठेवू नये. स्वत:चे खाते केव्हाही ब्लॉक ठेवावे. व्हाॅट‌्सॲपवर सुध्दा शक्यतो फोटो ठेवू नये. सेटिंगमध्ये जाऊन ओळखीच्या लोकांना फोटो दिसेल, अशी सेटिंग करावी. तरीही आपला छळ झाला तर कुटुंबातील व्यक्तीस विश्वासात घेऊन घटनेबाबत बोलले पाहिजे. तरीही या माध्यमातून वारंवार कोणी त्रास देत असेल, तर महिलांनी याबाबत नजीकच्या ठाण्यात अथवा सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.

तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक

बहुतांश महिला, तरुणी सोशल मीडियाच्या छळाला सामोरे गेलेल्या असल्या तरी तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही जण फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मुलींना प्रेमाचे आमिष दाखवितात. काही दिवसांनी मोबाइलवर अश्लील व्हिडिओ काढला जातो. या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडतात. बदनामीच्या भीतीपोटी अनेक महिला व मुली तक्रारी दाखल करीत नसल्याचे सायबर विभागाकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया १

महिला व मुलींनी निर्भय असले पाहिजे. सोशल मीडिया हे माध्यम खूप प्रभावी आहे. याचा वापर जपून करावा. त्याचा चुकीचा वापर करून कोणी त्रास अथवा ब्लॅकमेल करीत असेल तर मोठ्या हिमतीने पुढे यावे. बदनामीपोटी घाबरले तर समोरील व्यक्तीचा हिंमत अधिक वाढते. या प्रवृत्ती वेळीच ठेचणे आवश्यक आहे.

-सीमा पाटील, सचिव-राणी पद्मावती राजपूत महिला मंडळ, पिंप्राळा

प्रतिक्रिया २

सोशल मीडियाचा फायदा तितका तोटाही आहे. अनेक जण वेगवेगळे आमिषे दाखवून महिला व मुलींना जाळ्यात ओढत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यात खास करून मैत्री करून त्या फोटोंचा गैरवापर केला जात आहेत. माझ्याकडे असे काही प्रकरणे आली होती. कोणती महिला व मुली छळाला बळी पडली असेल त्यांनी आपल्याशी संपर्क करावा.

-मंगला बारी, सामाजिक कार्यकर्त्या

येथे करा तक्रार

सोशल मीडियावर छळ होत असेल तर सर्वात आधी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी. जिल्हा पातळीवर स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे आहे, तेथेही तक्रार करता येऊ शकते. त्याशिवाय पोलीस ठाणे पातळीवर महिला दक्षता समिती असून त्यातील महिला पदाधिकारी व सदस्यांकडे तक्रार करता येऊ शकते.

कोट...

महिला व मुलींनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जपून केला पाहिजे. शक्यतो ज्या गोष्टीची पूर्णत: माहिती नाही अशा साईडवर जाऊच नये. काही संशयास्पद मेसेज आला तर कुटुंबातील व्यक्तीला सांगा. आपली गोपनीय माहिती शक्यतो कोणाला शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीशी तर संपर्कच ठेवू नये. काही गैरप्रकार घडला तर तातडीने पोलिसांशी संपर्क करावा.

-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम

Web Title: Harassment of women on social media as well; 18 complaints to cyber!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.