बारशिवाय हॉटेल व्यवसाय चालणे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 05:12 AM2020-02-14T05:12:20+5:302020-02-14T05:12:52+5:30
मंत्री गुलाबराव पाटील; स्वयंरोजगाराचा सल्ला देताना दारूचे समर्थन
जळगाव : हॉटेलला परमिट रुम केले तर ते जोरात चालून व्यवसाय चारपटीने वाढतो, असा माझा स्वत:चा अनुभव आहे, असे धक्कादायक वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केले. स्वयंरोजगाराचा सल्ला देताना विद्यार्थी, बेरोजगार तरुणांसमोर असे वक्तव्य करून मंत्र्यांनी एक प्रकारे दारुचे समर्थनच केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
येथील केसीई सोसायटीच्या मैदानावर पंतप्रधान मुद्रा योजना जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद््घाटन पाटील यांच्याहस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.
पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचा सल्ला देताना काही स्वत:चे अनुभव सांगितले. अगोदर भाड्याने व्हिडिओ घेतला, बाजारात ऊस घेऊन तो विकू लागलो. नंतर शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राजकारणात आलो. त्यानंतर भाड्याने शाकाहारी हॉटेल सुरू केले. मात्र, ते हॉटेल चालत नव्हते. म्हणून तेथे बिअरबार, परमिटरूम सुरू केले. त्या वेळी व्यवसाय ४ हजार रुपयांवरून एकाच दिवसात २० हजारांवर पोहचला, असे पाटील यांनी आपल्या व्यवसायावर सारवासारव करताना सांगितले.