हरित-धरणगाव, दत्तक वृक्ष योजनेमुळे धरणगाव होणार हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:35+5:302021-07-07T04:19:35+5:30

धरणगाव : यावर्षीच्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याच्या अनुषंगाने जलदूत फाउंडेशन धरणगावतर्फे हरित-धरणगाव या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेत ...

Harit-Dharangaon, Dharangaon will become greener due to the adopted tree scheme | हरित-धरणगाव, दत्तक वृक्ष योजनेमुळे धरणगाव होणार हिरवेगार

हरित-धरणगाव, दत्तक वृक्ष योजनेमुळे धरणगाव होणार हिरवेगार

Next

धरणगाव : यावर्षीच्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याच्या अनुषंगाने जलदूत फाउंडेशन धरणगावतर्फे हरित-धरणगाव या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेत स्वत:च्या घराच्या आजूबाजूला वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यास इच्छुक व्यक्तींना जलदूत फाउंडेशन धरणगावतर्फे संपूर्ण वाढ झालेले प्रत्येकी एक रोप, संरक्षक जाळी आणि गांडूळ खत दिले गेले. या योजनेत आतापर्यंत ४० झाडांचे दायित्त्व धरणगाव परिसरातील नागरिकांनी घेतले आहे.

यातील १६ झाडे भोणे, ४ झाडे १३२ केव्ही सबस्टेशन, १३ झाडे एरंडोल परिसर, ५ झाडे अमळनेर रोडवर लावलेली असून, या झाडांची निगा राखून जोपासना करण्याची भूमिका या परिसरातील रहिवासी यांनी व्यक्तिगत घेतली आहे.

हरित-धरणगाव या योजनेसोबतच जलदूत फाउंडेशन धरणगाव संस्थेमार्फत ‘दत्तक वृक्ष’ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींना आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, विवाहप्रीत्यर्थ, वाढदिवसाच्या निमित्ताने, विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावता येईल. त्यासाठी रुपये १,१०० एवढी रक्कम जलदूत फाउंडेशन धरणगाव या संस्थेला देणगी स्वरूपात दिल्यास झाडाची देखभाल, मशागत, पाण्याची उपलब्धता याची संपूर्ण जबाबदारी जलदूत फाउंडेशन धरणगावची राहणार आहे.

आपल्या स्मृतींना मूर्तरूप देण्यासाठी जलदूत फाउंडेशन धरणगावमार्फत नातेवाइकांच्या नावाने एक पाटी झाडाच्या संरक्षक जाळीवर लावण्यात येईल. सोबत देणगीदाराचे नावदेखील राहील. या योजनेत देश-विदेशांतून आत्तापर्यंत २४ व्यक्तींनी आपल्या आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ वृक्ष दत्तक घेतले असून, हे वृक्ष पुढील आठ दिवसांत रोपण करून त्यांच्या देखभालीची जवाबदारी जलदूत फाउंडेशन घेणार आहे या योजनेत ५० वृक्ष लावले जाणार आहेत.

जलदूत फाउंडेशन धरणगावने गेल्या एक वर्षापासून मोरया नगर आणि रामकृष्णनगर येथे एकूण ५० वृक्ष जगवले आहेत आणि येत्या वर्षासाठी हरित-धरणगाव व दत्तक वृक्ष दोन्ही योजना मिळून एकूण १०० वृक्ष जगविण्याचा संकल्प केला आहे. तरी आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ वृक्ष दत्तक घेण्यासाठी व लवकरात लवकर योजनेत सहभागी होण्यासाठी प्रा. ए. आर. पाटील किंवा एस. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे.

योजना यशस्वी करण्यासाठी संजय तोडे, संजय पाटील भोणे, चिंतामण पाटील भोणे, डॉ. शैलेश सूर्यवंशी, संतोष सोनवणे, पी. डी. महाजन, कन्हय्या रायपूरकर, नितेश महाजन, डॉ. पंकज अमृतकर, डॉ. सूचित जैन, अभियंता सुनील शाह, योगेश भाटिया, मनोज महाजन, डॉ. आशिष सूर्यवंशी, विक्रांत पाटील परिश्रम घेत आहेत.

Web Title: Harit-Dharangaon, Dharangaon will become greener due to the adopted tree scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.