नगरसेवकांना हवीय सहानुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:38 PM2018-05-24T12:38:13+5:302018-05-24T12:38:13+5:30
-अजय पाटील
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सध्या शहरात सुरु असलेल्या विशेष अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान, अतिक्रमण विभागाने हॉकर्सकडून १० लाख रुपयांच्या वर माल व साहित्य जप्त केले आहे. हा माल घेण्यासाठी हॉकर्सकडून दररोज मनपा प्रशासनाकडे विनवण्या, अर्ज व निवेदने दिली जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून माल न देण्याबाबत ठाम आहे. यामुळे हॉकर्सने आपला मोर्चा नगरसेवकांकडे वळविला असून, जप्त माल मिळावा यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातूनही प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, मनपा निवडणूक जवळ आल्यामुळे ज्यांच्याकडून सहानुभुती मिळेल त्यांच्याकडून सहानुभूती मिळविण्यावर नगरसेवकांचा भर दिसून येत आहे. यामुळे अनेक नगरसेवकांकडून मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचारी व अधीक्षकांशी खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लवकरच नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे हे रूजू होणार आहेत. त्यामुळे मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी काही थोड्या दिवसात शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावून आपली बाजू सांभाळण्यावर देखील भर दिला आहे. एकीकडे नगसेवकांना हॉकर्सला पाठींबा देवून निवडणुकांसाठी सहानूभुती मिळून घ्यायची आहेतर आयुक्त पदाचा कार्यकाळात शहरात लावलेली शिस्त यासाठी प्रभारी आयुक्तांची कारवाई, या दोन मुद्यावरुन मनपा प्रशासन व नगरसेवक आमने-सामने आले आहेत. गेल्याच आठवड्यात खाविआ नगरसेवक नितीन बरडे यांचा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्याशी झालेला वाद यासह भाजपाचे गटनेते सुनील माळी यांनी देखील पत्र काढून जप्त करण्यात आलेला माल परत देण्याची केलेली मागणी यावरुन हे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, नगरसेवकांच्या वाढत्या दबावाला थारा जप्त करण्यात आलेला मालाचा लवकरच लिलाव करण्याच्या हालचाली देखील मनपाने सुरु केल्या आहेत. दरम्यान, मनपा महासभेने अतिक्रमण कारवाईबाबत ठराव केला होता. या ठरावामध्ये एका हॉकर्सचा माल पहिल्यांदा पकडला तर त्याच्यावर ५०० रुपये दंड ठोठावला जाणार होता. तर दुसऱ्यांदा माल पकडला त्याच्यावर १ हजार रुपये दंड ठोठवण्याचा व तिसºयांदा माल पकडला तर त्याचा माल कायमसाठी जप्त करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, हा ठराव मनपा प्रशासनाने गेल्याच महिन्यात शासनाकडे विखंडनासाठी पाठविल्यामुळे मनपा प्रशासन व नगरसेवक यांच्यामध्ये वाद वाढण्याची चिन्हे आहेत.