हतनूर धरणावर पोहोचले देशभरातील पक्षीनिरीक्षक; रशिया, चीनमधील पक्षांची झाली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:32 PM2018-02-01T12:32:54+5:302018-02-01T12:39:55+5:30
‘महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - जळगाव जिल्हा वन विभाग, सामाजिक वनीकरण जळगाव व चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या संयुक्तविद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवशीय स्थलांतरीत पक्षीनिरीक्षण शिबिराचा समारोप झाला.
‘महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र’ (आय.बी.ए.) या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त हतनूर धरण व परिसरात जलाशयाच्या दलदलीमुळे हिवाळ्याच्या दिवसांत पक्षांसाठी विपुल प्रमाणात अन्न उपलब्ध असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे हिवाळ्यात युरोप, सैबेरिया, रशिया, मंगोलिया, चीन, उत्तर भारत या भागातून स्थलांतर करुन येणा:या पक्षांची संख्या दिसून येत आहे. यावर्षी देशभरातून पक्षीअभ्यासकांनी पक्षीनिरीक्षणासाठी येथे हजेरी लावली.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार रक्षा खडसे, भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे, आयुध निर्माणी वरणगावचे महाप्रबंधक एस. चटर्जी, सामाजिक वनीकरण जळगावचे उपसंचालक सुरेंद्र वढई, महाराष्ट्र राज्य अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक (कॅम्पा) एस. एच. पाटील, प्रा. डॉ. सुनील नेवे, अटल प्रतिष्ठान भुसावळचे नगरसेवक नेमाडे आदी उपस्थित होते.
यावर्षी प्रथमच चातक निसर्ग संवर्धन संस्थेने हतनूर धरण परिसरातील मेहूण या ठिकाणी तीन दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात दिल्ली, बंगलोर, मुंबई, चेन्नई, पुणे, गुजरात, नागपूर इत्यादी ठिकाणांहून संपूर्ण भारतातील 25 पक्षीअभ्यासक तसेच पक्षीप्रेमींनी हतनूर धरण परिसर व नदीपात्रात बोटीमध्ये भ्रमंती करुन दुर्बीण व कॅमेरासारख्या विविध उपकरणांच्या साहाय्याने पक्षांचा अभ्यास केला.
35 वन अधिकारी आणि वनकर्मचारी असे एकूण 60 शिबिरार्थी होते, त्यात वन कर्मचा-यांना पक्षीनिरीक्षनाचे प्रशिक्षणही देण्यात आले.
हतनूर धरण परिसरात पक्षीअभ्यासकांना पक्षी वैविध्याची माहिती चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी दिली. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, लालसरी, थापाटय़ा, शेंडी बदक, नदीसुराय, छोटा शराटी, कृष्ण थिरथिरा, घोंगी, खंड्या, चातक व काही आंतरराष्ट्रीय स्तरावर धोकाग्रस्त जाहीर झालेल्या दुर्मिळ प्रजातीही या ठिकाणी आढळून आल्या. त्यांच्या संवर्धनासाठीच या जलाशयाला महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे.
चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, उपाध्यक्ष शिवाजी जवरे, सचिव उदय चौधरी, लक्ष्मीकांत नेवे, मनोज बडगुजर आदी सदस्य पक्षीप्रेमी व पक्षीअभ्यासक कार्यक्रमास उपस्थित होते.