हौसेला मोल नाही; दादा, भाऊसाठी जळगावकरांनी मोजले तीन कोटी ७७ लाख
By विलास बारी | Published: January 12, 2024 08:27 PM2024-01-12T20:27:28+5:302024-01-12T20:27:44+5:30
१ नंबरसाठी मोजले तब्बल ३ लाख : आरटीओ कार्यालयाचा ५७ लाखांचा महसूल वाढला
जळगाव : हौसेला मोल नसते. दुचाकी व चारचाकी वाहनांना फॅन्सी नंबरची हौस पूर्ण करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांनी गेल्या वर्षभरात तब्बल तीन कोटी ७७ लाख ४७ हजार रुपये मोजल्याची माहिती समोर आली आहे. एक नंबरसाठी वाहनधारकांनी तब्बल तीन लाख रुपये मोजले आहे.
गाडीचा नंबर जितका आकर्षक तितका रुबाब जास्त असा अनेकांचा समज आहे. आपल्या गाडीपेक्षा तिचा नंबर कसे दुसऱ्याचे लक्ष वेधून घेईल याकडे अनेकांचा कल असतो. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजण्याची तयारीदेखील वाहनधारकांची असते.
जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांचा समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत तब्बल ४ हजार ८१० जणांनी चॉइस नंबर घेत आरटीओ कार्यालयाकडे तीन कोटी ७७ लाख ४७ हजार रुपयांच्या रकमेचा भरणा केला आहे.
दोन वर्षांत सुमारे सात कोटी रुपयांची वसुली
जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाला चाॅइस नंबरच्या माध्यमातून चांगला महसूल मिळाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत चार हजार १११ वाहनधारकांनी चाॅइस नंबरसाठी अर्ज केला होता. या माध्यमातून तीन कोटी २० लाख ४ हजार रुपयांचा महसूल जमा झाला. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ४ हजार ८१० वाहनधारकांनी चाॅइस नंबरसाठी अर्ज केला होता. त्यापोटी तीन कोटी ७७ लाख ४७ हजार रुपयांचा महसूल आरटीओ कार्यालयाला प्राप्त झाला.
चॉइस नंबर कसा मिळवाल ?
नवीन वाहन घेतल्यानंतर चॉइस नंबर घ्यायचा असल्यास त्यासाठी सुरुवातील आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागेल. त्यानंतर हा नंबर उपलब्ध असल्यास त्या रकमेचा डीडी भरावा लागेल. उपलब्ध असल्याची पावती घेऊन ती शो-रूमला देत नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया करीत असताना वाहनधारकाचा मोबाइल नंबर आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे.
या नंबरला सर्वाधिक मागणी
जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनधारकांकडून ९०९, ४१४१,१०१०,७१७१,९९९९,२१२२,५५५५,७७७७ या नंबरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासोबत १,११, १००० या नंबरलादेखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. १ नंबरसाठी तर वाहनधारक तब्बल तीन लाख रुपये मोजत असतात. त्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागल्यास तीदेखील करीत असतात.
५७ लाखांचा महसूल वाढला
दिवसेंदिवस चॉइस नंबरची मागणी वाढत असल्याने प्रत्येक वर्षी यासाठी अर्ज करणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढतच आहेत. २०२२ मध्ये चार हजार १११ वाहनधारकांनी अर्ज केले होते. ते २०२३ मध्ये चार हजार ८१० वाहनधारकांनी अर्ज केला आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये तब्बल ५७ लाख ४३ हजार रुपयांचा वाढीव महसूल मिळाला आहे.