संकटावर मात करण्या धैर्य दे.. सामर्थ्य दे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:43 PM2019-11-18T12:43:41+5:302019-11-18T12:44:23+5:30
देव आणि दानवांचा लढा म्हणजे सात्विक आणि राक्षसी वृत्तींचा लढा, त्यानुसार पुराणामधे तश्या अनेक कथा आहेत, अन् त्यातून सुंदर ...
देव आणि दानवांचा लढा म्हणजे सात्विक आणि राक्षसी वृत्तींचा लढा, त्यानुसार पुराणामधे तश्या अनेक कथा आहेत, अन् त्यातून सुंदर संदेश पोहचवला आहे.
त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता. त्याने तीन पुऱ्या वसवल्या. म्हणून त्याचे नाव त्रिपुरासूर. त्याने कपटाने देव लोकांचा अमृतकुंभ चोरून आणला. शत्रूपक्षाचे वैशिष्ठ असलेला अमृतकुंभ आता माझेजवळ आहे, त्रिपुरासुराचा अहंकार अतोनात वाढला. राक्षसी वृत्तीला यश पचवता येत नाही. कारण यशाचा कर्तेपणा ते स्वत:कडेच ठेवतात, उच्च शक्तीकडे सोपवत नाही.
देव लोकांच्याकडे खळबळ माजली. अमृतकुंभाच्या सुरक्षेची चौकशी करण्यात आली. पण त्याचा तपास लागेना. देव लोकांकडील अमृतकुंभ आता आपल्याजवळ आहे, माझा कोणीही पराभव करू शकत नाही. शत्रूपक्षाला खिंडीत गाठण्याची हीच वेळ आहे, असे म्हणून त्रिपुरासुराने देवलोकांना युद्धाचे आव्हान दिले. भोलेनाथ महादेवाचे सैन्य आणि त्रिपुरासुराचे सैन्य तुंबळ युद्ध झाले. त्रिपुरासुराचे सगळे सैन्य मारले गेले युद्धात. परंतु अमृताच्या जोरावर सैन्य पुन्हा जिवंत झाले. पुन्हा युद्ध होऊन त्रिपुरासुराचे सैन्य मारले जाणे अमृताच्या जोरावर पुन्हा जिवंत होणे, असे वारंवार घडू लागले.
देवांना शंका आली की, राक्षससेना वारंवार जिवंत होत आहे, शत्रुपक्षाकडेच अमृतकुंभ असावा, तपासाअंती कळले की, त्रिपुरासुराने अमृतकुंभ चोरून तो आपल्या गोशाळेत लपवून ठेवला आहे. भगवान विष्णूने गाय आणि ब्रह्मदेवाने वासराचे रुप घेतले. त्रिपुरासुराच्या गोशाळेत प्रवेश केला अन त्या गोमातेने आपल्या श्ािंगाने तो अमृतकुंभ फोडू टाकला.
भोलेनाथाने शत्रूपक्षाला युद्धाचे आव्हान दिले. भयंकर युद्ध झाले. अमृतकुंभ नाहिसा झाल्यामुळे त्रिपुरासुराचे सैन्य पुन्हा जिवंत होऊ शकले नाही. त्रिपुरासूर घाबरून सैरावैरा धावू लागला. महादेवाने त्रिपुरासुराला धरले आणि नाश केला, तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा.
त्रिपुरासुराच्या रुपाने आलेले घोर संकट भोलेनाथांच्या पराक्रमाने नाहीसे झाले. सर्वत्र दिव्यांची आरास करण्यात आली. महादेवासमोर कापूर लावला गेला. दीपमाळ सुशोभित करण्यात आली. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा केला जातो. यामुळेच सद्गुरूनाथांना प्रार्थना करावी की, आमच्या जीवनात जर काही संकटे-समस्या आली तर आम्हास धैर्य दे. संकटाला सामोरा जाण्याचे सामर्थ्य दे. आम्ही अखंड रामनामाचे अनुसंधान ठेवू. कारण सद्गुरूंचा निवास नामात आहे.
- राया उपासनी, निजामपूरकर