बोदवडला चोरट्यांचा कहर : भरदिवसा दोन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 20:45 IST2020-08-10T20:44:05+5:302020-08-10T20:45:51+5:30
चोरट्यांनी कहर केला असून, भरदिवसा दोन घरे चोरट्यांनी फोडली. यातून सुमारे तीन लाखांवर मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.

बोदवडला चोरट्यांचा कहर : भरदिवसा दोन घरे फोडली
गोपाळ व्यास
बोदवड : शहरात चोरट्यांनी कहर केला असून, भरदिवसा दोन घरे चोरट्यांनी फोडली. यातून सुमारे तीन लाखांवर मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. दोन्ही घरफोड्या सोमवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान झाल्या.
सूत्रांनुसार, शेलवड येथे पोलीस पाटील असलेले प्रदीप सुकाळे यांचे बोदवड शहरातील विद्यानगरमध्ये भरवस्तीत घर आहे. त्यांच्या घरातील मंडळी सोमवारी बाहेरगावी गेलेली होती, तर प्रदीप सुकाळे हे शेलवड येथे पालसखेड येथील मित्राच्या घरी द्वारदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घराशेजारील मंडळींचा सुकाळे यांना फोन आला. ‘तुमच्या घराचा दरवाजा वाजत आहे, लावून घ्या’, असे सांगितले. तेव्हा ‘घरी तर कोणीच नाही. मी कुलूप लावून शेलवडला आलो आहे,’ असे सुकाळे यांनी त्या गृहस्थाला सांगितले. शेजारच्यांनी घर उघडे असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी घरी धाव घेतली. घरासमोरील दरवाजाला कुलूप नव्हते, तर घर उघडेच होते. आत जाऊन पाहिले तर कपाटही उघडे होते.
कपाटात अडीच लाख रुपये रोख होते. त्यात पाचशेच्या एकशे ९६ नोटा, तर इतर नोटा दोन हजारांच्या होत्या. ही रक्कम एकाला देण्यासाठी त्यांनी काढून ठेवली होती. ती न दिसल्याने त्यांनी डोक्याला हात मारून घेतला. बाजूलाच सोन्याचे दागिने पाहिले असता सुदैवाने ते तेथेच असल्याने थोडक्यात बचावले. चोरांनी कुलूपही सोबत नेले. पलंगावरील उशीचे कव्हर नव्हते. त्यामुळे चोरट्यांनी ही रक्कम उशीच्या कव्हरमध्ये टाकून नेली असावी.
दुसºया घटनेत शहरातील स्टेशन रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयजवळ राहणाºया इंदूबाई दिवानसिंग पाटील यांच्याही बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडले. कपाटातील आठ हजार रोख, चांदीचे जोडवे, चांदीचा आकडा, करदोडा, असा एकूण १२-१३ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. या घरातील मंडळीही जामनेर तालुक्यातील तोरनाळा येथे सकाळी नऊ वाजता मयताच्या ठिकाणी गेले होते. दुपारी चार वाजता घरी आल्यावर घर उघडे दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेतही चोरांनी घराचे कुलूप सोबत नेले आहे.