‘एचबीडी पंजाब’चा रुग्ण आढळला जळगावात! १६ वर्षीय तरुणीला लागण; यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 10:35 AM2024-01-07T10:35:56+5:302024-01-07T10:36:13+5:30
रक्तातील नात्यात विवाह केल्यामुळे होतो हा आजार
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: धरणगाव तालुक्यातील साळवा येथील एका १६ वर्षीय तरुणीला ‘एचबीडी पंजाब’ या दुर्मीळ आजाराची लागण झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या तरुणीला गेल्या सहा महिन्यांपासून कमालीचा अशक्तपणा जाणवत होता. तिची धरणगावातील सरकारी दवाखान्यामध्ये तपासणी केली. त्यात हिमोग्लोबीनची पातळी ४.४ ग्रॅम डेसिलीटर इतकी कमी आढळली. त्यामुळे तिला जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले. तिच्या रक्ताच्या चाचण्यातून तिच्या रक्तामधील लालपेशींची संख्या कमी असून त्याचा आकार कमी असल्याचे आढळले. तसेच, एचबी इलेक्ट्रोफोरेसिस ही तपासणी केली असता एचबीडी पंजाब या आजाराचे निदान झाले.
रक्तातील नात्यात विवाह केल्यामुळे होतो हा आजार
- त्यातच एचबीडी पंजाब हा रक्ताच्या संबंधित एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. रक्तातील नाते असलेल्या व्यक्तीसोबत विवाह केल्यामुळे याची लागण होत असल्याचे आढळून येतो.
- या आजाराच्या रुग्णांची संख्या पंजाब व हरियाणा या राज्यात तुलनेने सर्वाधिक असल्यामुळे याला एचबीडी पंजाब असे नाव पडल्याचे तज्ज्ञ सांगतात.
- ॲनिमिया (रक्तक्षय) च्या रुग्णामध्ये जर एचबी इलेक्ट्रोफोरेसिस ही तपासणी केली तर १४६० रुग्णांमधून फक्त दोन टक्के रुग्णांमध्ये हिमोग्लोबीन डी. पंजाब हा आजार आढळून येत असल्याचे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. भाऊराव नाखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या आजाराची अशी आहेत लक्षणे
रक्तामधील लोहाचे प्रमाण कमी आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियासारखी असतात. या रोगामध्ये हिमोग्लोबीन मधील बिटाग्लोबीनमधील १२१ च्या ठिकाणी असलेले ग्लुटामाइनची जागा ग्लुटामिक ॲसिड घेत असते. त्यामुळे रुग्णास ॲनिमिया होतो. जर यासोबत सिकल हिमोग्लोबीन असल्यास रुग्णास गंभीर प्रकारचा ॲनिमिया होतो.