झोप लागली नाही म्हणून जीव वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:14+5:302021-02-16T04:18:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : धुळ्यापासून गाडी निघाल्यानंतर पूर्ण वेळ आपल्याला झोपच आली नाही...अपघात होणार असल्याची स्थिती येताच आपण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : धुळ्यापासून गाडी निघाल्यानंतर पूर्ण वेळ आपल्याला झोपच आली नाही...अपघात होणार असल्याची स्थिती येताच आपण गाडीच्या अँगलला पकडून ठेवले आणि या भीषण अपघातातून आपला जीव बचावला.. मात्र, आपल्या सोबतचे सहकारी दबलेले बघून काळजाचा तिळपापड झाला, अशी आपबीती या अपघातातून बचावलेल्या सत्तार अकबर (३५) यांनी ‘लोकमत’कडे मांडली आहे.
किनगावजवळ पपई घेऊन जाणारा टेम्पो उलटून पंधरा मजुरांचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. अपघात झाल्यानंतर सत्तार अकबर हेदेखील मानेपर्यंत टेम्पोखाली दबले होते. त्यांना तातडीने केबिनमध्ये बसलेल्या तिघांनी बाहेर काढले. अपघात होताच जखमींनी व्यापाऱ्याशी संपर्क केला. अर्ध्या तासाच्या आत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याचे सत्तार अकबर यांनी सांगितले.
१२ टन पपई अन् घात
धुळे येथून १२ टन पपई भरून रात्री ८ वाजेच्या सुमारास सर्व मजूर निघाले. चालकाजवळ केबिनमध्ये दोन लोक बसलेले होते. वीस ते बावीस मजूर असतील. यातील पंधरा जण हे वाहनाच्या मध्यमागच्या थोड्या पुढे बसून झोपी गेले होते. आपण मात्र, मागच्या बाजूस होतो आणि जागे होतो. वाहनाचे ॲक्सल तुटताच एका झाडाला ते आदळले व थेट उलटले यात मजूर दबले गेले व बारा टन पपई त्यांच्या अंगावर पडून होती. विशेष बाब म्हणजे चालकासह तिघांना जास्त दुखापत झालेली नव्हती. त्यांनी मला बाहेर काढले. असे सत्तार यांनी सांगितले. घरी आई व दोन मुले आहेत. पाच वर्षांपासून हे मजुरीचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताच्या अर्धा तास कसलीच शुद्ध नव्हती, असे त्यांनी सांगितले.
पहाटे रुग्णालयात
जखमी सत्तार अकबर आणि १८ वर्षीय हसन शहा यांना पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. सत्तार यांच्या पोटाला आणि पायाला मुकामार लागला आहे. पोटात मार लागल्यामुळे त्यांना बोलणेही कठीण होत होते. त्यांच्यासोबत अनवर तडवी आणि शरीफ तडवी हे थांबून आहेत.
शहा खासगी रुग्णालयात
हसन शहा याच्या मांडीला दुखापत झाल्याचे डॉ. उमेश जाधव यांनी सांगितले. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याला नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात हलविले.
जिल्हाधिकारी यांनी केली विचारपूस
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जखमीं सत्तार अकबर यांना भेटून दुपारी तीन वाजता विचारपूस केली. यावेळी डॉ. उमेश जाधव यांनी जिल्हाधिकारी राऊत यांना माहिती दिली. यासह शहा याचे केसपेपरही जिल्हाधिकारी यांनी तपासले.
फोटो आहे