दुचाकी चोरुन पळाला अन् अपघात झाल्याने पोलिसांच्या जाळ्यात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:22 AM2021-02-17T04:22:03+5:302021-02-17T04:22:03+5:30
दवाखान्यातूनच केली अटक : एमआयडीसी पोलिसांची कारवाई फोटो जळगाव : एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या ग्राहकाची दुचाकी पळविली, ...
दवाखान्यातूनच केली अटक : एमआयडीसी पोलिसांची कारवाई
फोटो
जळगाव : एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या ग्राहकाची दुचाकी पळविली, मात्र रस्त्यात अपघात झाला अन् तेथे चोरीची बोंब फुटली. पोलिसांनी या चोरट्याच्या दवाखान्यातूनच मुसक्या आवळल्या. प्रल्हाद जयराज पाटील (२१, रा.कुसुंबा, ता. जळगाव) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
सम्राट कॉलनीतील रहिवासी भीमराव सुकलाल बारी हे एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरीला आहेत. १३ रोजी मित्रांसोबत जेवणासाठी हॉटेल सुमेरसिंग येथे गेले असता अज्ञात चोरट्याने बाहेर पार्किंगमध्ये उभी दुचाकी लंपास केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. संशयिताचा शोध सुरू असतानाच ही दुचाकी प्रसाद जयराज पाटील याने चोरून नेली असून याच चोरीच्या दुचाकीने मुक्ताईनगरकडे जातांना त्याचा अपघात झाला, अशी माहिती एमआयडीसी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार अतुल वंजारी, चेतन सोनवणे, सचिन मुंडे, सचिन पाटील यांच्या पथकाला सूचना केल्या. पथकाने आज अपघातात जखमी संशयित प्रसाद जयराज पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरून नेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.