सराफ दुकानात दरोडा टाकून मिळवली सुरक्षा रक्षकाची नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:13 AM2021-07-15T04:13:48+5:302021-07-15T04:13:48+5:30
यावलच्या गुन्ह्याचा उलगडा : नवी मुंबईतून एकाला अटक सुनील पाटील जळगाव : यावल येथे सराफ दुकानात भरदिवसा पिस्तुलाचा धाक ...
यावलच्या गुन्ह्याचा उलगडा : नवी मुंबईतून एकाला अटक
सुनील पाटील
जळगाव : यावल येथे सराफ दुकानात भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ११ लाख २६ हजार ६७५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (वय ३१,रा.कांदिवली, मूळ रा. रामनगर कन्नड, जि.औरंगाबाद) याला नवी मुंबईतून अटक करण्यात आली. दरोडा टाकल्यानंतर चारही जण वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले. त्यातील निवृत्ती याने नवी मुंबईत एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळवली होती.
यावल येथे ७ जुलै रोजी काळ्या रंगाच्या दुचाकीने आलेल्या चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून काचेचा काउंटर फोडले होते व ११ लाख २६ हजार ६७५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी जगदीश रत्नाकर कवडीवाले यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी लागलीच घटनास्थळ गाठून तेथेच चौकशी पथक तयार केले होते. या चौघातील एक जण थेट नवी मुंबईत दाखल झाला व तो तेथे सुरक्षा रक्षकाचे काम करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार बकाले यांनी क्षणाचाही विलंब न लावता सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, शरद भालेराव, राजू मेढे, रामकृष्ण पाटील, अशोक पाटील व किरण चौधरी यांचे पथक रवाना केले. या पथकाने मंगळवारी रात्रीपासून तेथे सापळा लावला. निवृत्ती जसा ड्युटीवर आला तसा त्याला पथकाने हेरले.
दागिने दुसऱ्या संशयिताकडे
निवृत्ती याने गुन्ह्याची कबुली दिली असून दागिने मुकेश प्रकाश भालेराव (रा.भुसावळ) याच्याकडे असून हा गुन्हा करताना रुपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी, मुकेश भालेराव, सुनील अमरसिंग बारेला व चंद्रकांत उर्फ विक्की लोणारी (सर्व रा.भुसावळ) आदी जण सोबत असल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर सर्व जण वेगवेगळ्या दिशेने गेले. निवृत्ती हा देखील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी प्राणघातक हल्ला व शस्त्र आदी प्रकारचे गुन्हे त्याच्याविरुध्द दाखल आहेत. त्याला बुधवारी रात्री यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कारागृहातून मिळाले गुन्हेगारीचे धडे
निवृत्ती हा रोजगारानिमित्त जळगावात आला. एमआयडीसीतील हॉटेलमध्ये वेटर होता. २०१५ मध्ये कालिका माता चौकात एका जणावर त्याने प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हा त्या गुन्ह्यात कारागृहात गेला होता. तेथे त्याची भुसावळातील सराईत गुन्हेगार मुकेश भालेराव याच्याशी ओळख झाली. तेथून दोघांमध्ये मैत्री झाली व नंतर गुन्हेगारीचे धडे गिरवायला सुरुवात केली.