पैशासाठी त्याने जन्मदात्यांच्याच पोटात घातल्या लाथा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:06+5:302021-04-21T04:16:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पैसे व शेत जमिनीसाठी जन्मदात्या आई-वडिलांच्या पोटात लाथा व कानाखाली आवाज काढून मुलानेच त्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पैसे व शेत जमिनीसाठी जन्मदात्या आई-वडिलांच्या पोटात लाथा व कानाखाली आवाज काढून मुलानेच त्यांना घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आई, वडिलांना मारहाण करणारा हा मुलगा जळगाव पोलीस दलात कार्यरत आहे. हे वृद्ध दाम्पत्य आज एका वृद्धाश्रमात अश्रू ढाळत आहेत.
लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन या वृद्ध दाम्पत्याची भेट घेतली. त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. ७३ वर्षीय पांडुरंग व ६८ वर्षीय सुमन (नाव बदलली आहेत.) १६ एप्रिल रोजी वृद्धाश्रमात दाखल झाले. पांडुरंग हे नागपूर पोलीस दलात नोकरीला होते. मुलगा संदीप हा देखील नागपूर पोलीस दलात नोकरीला होता. सेवानिवृत्तीनंतर ते काही दिवस नागपुरातच राहिले, नंतर मुलाच्या आग्रहाखातर तेथील नऊ खोल्यांचे घर विक्री करून जळगावात आले. मुलानेही आपली जळगावात बदली करा नाही तर राजीनामा देतो असा दम भरला. वडिलांनी पोलीस दलातील ओळखीचा वापर करून मुलालाही जळगावात आणले.
नागपुरातले घर २७ लाखात विक्री केल्यानंतर जळगावात जागा घेऊन २२ लाखाचे घर बांधले. घर बांधल्यानंतर उरलेले साडे चार लाख रुपये मिळावे म्हणून संदीप याने वडिलांशी वाद घातला. तेथूनच वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
१२ एप्रिलचा प्रसंग सांगताना ते ढसाढसा रडले
१२ एप्रिल रोजी कपड्यांवरून पती-पत्नीत वाद झाला. त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता संदीप याने पोटात जोरात लाथ मारली, त्यानंतर कानाखाली वाजवली. याच्याही पुढे जावून कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या आईला मारहाण करून खाटेसह बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, हा प्रसंग सांगत असताना वृद्ध दाम्पत्य ढसाढसा रडू लागले. १२ तारीख डोळ्यासमोर आली की कसंतरी होतंय, असा मुलगा डोळ्यासमोरही नको अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. याआधी ६ नोव्हेंबर २०२० व १ फेब्रुवारी २०२१ रोजी अशीच मारहाण केली होती, असे पांडुरंग यांनी सांगितले.
पेन्शनचे तीन लाख रुपये नेले
पेन्शन व फंडाचे जमविले तीन लाख रुपये मुलगा संदीप याने धाकात घेऊन नेले. या आधी पत्नीच्या नावावर असलेली दोन एकर शेत जमीन जबरदस्तीने सह्या घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतली घरातले काही दागिनेही आज सापडत नाही.
शिक्षिका मुलीची एस.पींकडे तक्रार
पांडुरंग यांची मुलगी औरंगाबाद येथे आहे. आई-वडिलांना असलेला त्रासाबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रत्यक्ष फोनवर बोलून घटनाक्रम सांगितला. पोलीस अधीक्षकांनी आई-वडिलांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा असल्याचे या शिक्षिकेने ''लोकमत''ला सांगितले.
कोट...
मुलासाठी आम्ही काय केले आहे, हे आम्हालाच माहित. मात्र ऐन वृद्धापकाळात मुलाकडून असा छळ होईल हे स्वप्नातही बघितले नव्हते. या मुलाचे आम्हाला आता तोंडही बघायचे नाही. वृद्धाश्रमात येऊन तो आम्हाला मारहाण करू शकतो.
- पोलीस अमलदार मुलाचे वडील