सार्वजनिक व्यायामशाळेच्या पुनरुज्जीवनासाठी ‘तो’ झटतोय एकटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:12+5:302021-07-10T04:12:12+5:30

तालुक्यातील सर्वात मोठे, महत्त्वाचे गाव व २३ खेड्यांची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून नगरदेवळा गावाची ओळख आहे. चाळीस हजार लोकवस्तीच्या गावातील ...

He is the only one who is fighting for the revival of the public gymnasium | सार्वजनिक व्यायामशाळेच्या पुनरुज्जीवनासाठी ‘तो’ झटतोय एकटा

सार्वजनिक व्यायामशाळेच्या पुनरुज्जीवनासाठी ‘तो’ झटतोय एकटा

googlenewsNext

तालुक्यातील सर्वात मोठे, महत्त्वाचे गाव व २३ खेड्यांची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून नगरदेवळा गावाची ओळख आहे. चाळीस हजार लोकवस्तीच्या गावातील तरुणाईसाठी स्वतंत्र सार्वजनिक व्यायामशाळा नाही. स्व. जानकीबाई थेपडे ट्रस्टच्या भग्न इमारतीत २०११ पासून जय बजरंग व्यायामशाळा सुरू होती. येथेच ही तरुणाई अनेक वर्षांपासून व्यायाम करत होती. येथेच व्यायामाचे धडे घेणाऱ्या ईश्वर धनराज पाटील ऊर्फ बापू या सुशिक्षित शेतमजुराने इमारतीचे तुटलेले दरवाजे, खिडक्या, खड्डे पडून ओबडधोबड झालेली व्यायमशाळा, जुने, तुटफूट झालेले साहित्य, रंगहीन भिंती, विजेची व्यवस्था व लाइट, पंखे नाहीत हे पाहून ही दुरवस्था दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. भग्न अवस्थेमुळे व्यायामशाळेत येणाऱ्या तरुणांचीही संख्या रोडावली होती. हे सर्व चित्र पाहून बापू पाटील व्यथित झाला होता. १२वीपर्यंत शिक्षण झालेल्या या तरुणाने व्यायामशाळेत सुधारणा घडवून आणण्याचा चंग बांधला. त्यासाठी आधी त्याने व्यायामासाठी येणाऱ्या तरुणांना संघटित करून, त्यांची बैठक घेऊन, प्रत्येकाने काही मासिक वर्गणी काढून जमलेल्या रकमेतून साहित्य विकत घ्यावे व दुरुस्ती करावे असे ठरवले व त्यासाठी १०० रुपये वर्गणी जमा करत जमलेल्या रकमेत स्वतःची भरीव रक्कम खर्च करण्याचे ठरवले. बापूकडे केवळ ५ एकर कोरडवाहू शेती आहे. वर्षभर सिमेंटच्या ट्रक खाली करणे, केळी, कपाशी, मका गाडी भरणे आदी शेत व हातमजुरीची कामे करणाऱ्या बापूने लाॅकडाऊनच्या वर्षभरातील कालखंडातील शेतमजुरीच्या रकमेतून काही रक्कम बाजूला काढत हळूहळू सिमेंट, रेती, खडी, रंग, ब्रश, विटा आदी साहित्य जमा केले. कारागिरांच्या मदतीने तरुणांना सोबत घेत व्यायामशाळा इमारतीच्या आतील खड्डे दुरुस्त करत कोबा करून घेतला. दरवाजे दुरुस्ती, खिडक्या लावून घेतल्या. वीजजोडणी घेऊन ट्यूबलासट, पंखे, बल्ब बसवले. सिमेंट, रेतीचे डंबेल्स व वेटलिफ्टिंग, लोखंडी साहित्य वेल्डिंग करून साहित्य तयार केले तर काही साहित्य विकत घेत अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावत व्यायामशाळेच्या आतील भागाचा कायापालट केल्याने व्यायाम करताना तरुणांचे मन प्रसन्न होत आहे.

त्यासाठी स्वतः मजुरी करून कमावलेली रक्कम खर्च करतानाच, योग्य ते आवश्यक बदल करत सुसज्ज व्यायामशाळेचे रूप बघायला मिळत आहे. व्यायामशाळेतील वातावरण प्रसन्न झाल्याने तरुणांची पावले पुन्हा इकडे वळू लागली आहे. व्यायामशाळेस काही कमतरता जाणवली तर इतर तरुणही ती तत्परतेने पूर्ण करतात. अशा या व्यायामशाळेस समाजाच्या व शासनाच्या मदतीची आवश्यकता असल्याचा आशावाद बापू पाटील याने व्यक्त केला आहे.

Web Title: He is the only one who is fighting for the revival of the public gymnasium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.