प्रेमविवाह करून मंगळवारी परतले अन्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:40+5:302021-01-02T04:13:40+5:30
फोटो आहे लोकमत न्यूज नेटवर्क़ जळगाव : पाळधी येथील एका तरुणीने गावातीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्यानंतर दोन दिवसातच अर्थात ...
फोटो आहे
लोकमत न्यूज नेटवर्क़
जळगाव : पाळधी येथील एका तरुणीने गावातीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्यानंतर दोन दिवसातच अर्थात शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरती विजय भोसले (२०, रा. पाळधी) असे या तरुणाीचे नाव नाव आहे. दरम्यान, सासरच्या मंडळीने तिचा घातपात केला असल्याचा आरोप करीत त्यांना अटक होत नाही तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा माहेरच्यांनी घेतल्याने शुक्रवारी दुपारी जिल्हा रूग्णालयात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आरती भोसले ही तरुणी ६ डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता झाली होती. मुलगी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पाळधी पोलिसांत बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. दरम्यान, मंगळवार, २९ डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या दिवशी ती पाळधी गावातीलच प्रशांत विजयसिंग पाटील या तरुणासोबत विवाह करून परतली. तिचे प्रशांतवर प्रेम होते.
वडिलांना बोलाविले पोलीस ठाण्यात
प्रेमविवाह केल्यानंतर मंगळवारी आरती व प्रशांत पाळधी पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांना प्रेमविवाह केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दोन्ही कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर आरती त्याच दिवशी पती प्रशांतसोबत सासरी गेली.
‘प्रशांत’चा मित्र आला धावत...
आरती हिला सासरी दोन दिवस होत नाही, तोवर शुक्रवारी सकाळी तिच्या पतीचा मित्र हा आरतीच्या माहेरी धावत गेला आणि आरतीच्या आईला त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. हे ऐकताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरतीच्या काकूलाही घटना कळताच, त्यांनीसुध्दा धाव घेतली. आरतीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला.
सासरचे व मित्रांनी घातपात केल्याचा आरोप
सकाळी जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर मुलीचा पती, त्याचे वडील व मित्रांनी घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. तिच्यावर अत्याचार केल्याचाही खळबळजनक आरोप आरतीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, जेव्हा आरती हिचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते, त्यामुळे हा घातपात आहे, त्यामुळे संबंधितांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भोसले कुटुंबीयांनी केली.
मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा
३१ डिसेंबर असल्यामुळे आरतीचा पती व त्याच्या मित्रांनी घरात रात्री पार्टी केली. त्यानंतर घातपात केला असून, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा आरतीच्या कुटुंबीयांनी घेतल्याने रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता. पाळधी पोलिसांना रुग्णालयात पाचारण करण्यात आले.
पती व मित्रांना घेतले ताब्यात; माहेरच्यांनी स्वीकारला मृतदेह
दुपारी पाळधी पोलीस ठाण्याचे एपीआय हनुमंतराव गायकवाड हे जिल्हा रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी भोसले कुटुंबीयांची समजूत घालत आरतीचा पती व त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मयत विवाहितेच्या वडिलांनी मृतदेह स्वीकारला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मृतदेह पाळधी येथे नेण्यात आल्याचे समजते.