जळगावमध्ये बहिणीला सांगून नोकरी शोधायला गेला, पण घरी तरुणाचा मृतदेहच आला!
By विजय.सैतवाल | Published: August 20, 2023 04:28 PM2023-08-20T16:28:56+5:302023-08-20T16:29:40+5:30
अंकुश सुरळकर हा जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या मेहुणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आला होता.
जळगाव : तालुक्यातील मन्यारखेडा येथील तलावात बुडाल्याने अंकुश शिवाजी सुरळकर (२२, रा. धामणगाव, जि. बुलढाणा) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. हा तरुण जळगावात नोकरीच्या शोधात आला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंकुश सुरळकर हा जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या मेहुणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आला होता. गुरुवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. शनिवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मन्यारखेडा गावानजीक असलेल्या तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
सुरुवातीला नशिराबाद पोलिस ठाण्यात अनोळखी म्हणून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर नातेवाइकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मयताची ओळख पटविली. मृतदेह अंकुश सुरळकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. मयताच्या पश्चात आई कामिनी, वडील शिवाजी दशरथ सुरळकर, मोठा नीलेश आणि विवाहीत बहीण असा परिवार आहे.