अपघातानंतर दीड महिना घरीच होता, दसऱ्याला रेल्वेखाली केली आत्महत्या; पिंप्राळ्यातील तरुणाने आयुष्य संपवले, कारण अस्पष्ट
By विजय.सैतवाल | Published: October 25, 2023 03:45 PM2023-10-25T15:45:07+5:302023-10-25T15:46:25+5:30
याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : घरासह परिसरात विजयादशीचा सण साजरा केला जात असताना अभिषेक सुभाष राठोड (२२, रा. आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री आशाबाबा नगरजवळ घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिंप्राळा भागात आई-वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत राहणारा अभिषेक राठोड हा तरुण मुंबईतील एका विधी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. दुचाकी अपघात झाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून तो जळगावातच राहत होता. मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री अभिषेकने आशाबाबा नगर परिसरात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तरुणाजवळील मोबाईलच्या आधारे ओळख त्याची ओळख पटली.
घरात आनंदाचे वातावरण अन् मुलाच्या मृत्यूची वार्ता धडकली
मंगळवारी दसरा सण साजरा केला जात असताना राठोड यांच्या घरीही आनंदाचे वातावरण होते. त्याच वेळी मुलाच्या मृत्यूची वार्ता समजली अन् या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. या प्रकरणी अभिषेक हा पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील (कंट्रोल रुम) सुभाष राठोड यांचा मुलगा होता. मयताच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहेत.