पैशाची उधळपट्टी केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:45 AM2020-05-26T11:45:30+5:302020-05-26T11:45:47+5:30
साडेपाच लाखाचा ऐवज हस्तगत : जामनेरच्या घरफोडीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
जळगाव : जामनेर शहरात घरफोडी केल्यानंतर त्याच पैशाची १७ दिवसानंतर जामनेरात उधळपट्टी करीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे (रा.आठवडे बाजार, भुसावळ) व सय्यद मुयोद्दीन सय्यद मुकिद्दीन उर्फ पोटल्या (रा.बोदवड रोड, भुसावळ) या दोघांच्या सोमवारी दुपारी जामनेरातील गांधी चौकातून मुसक्या आवळल्या. दरम्यान, त्यांच्याकडून २ लाख ३३ हजार रुपये रोख व ३ लाख २४ हजार रुपये किमतीचे ६९ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.
जामनेर शहरात ८ मे रोजी पहाटे तीन ते चार वाजता बळीराम जयराम माळी (७५, गिरीजा कॉलनी, जामनेर) यांच्या घरातून चोरट्यांनी ८ लाख ५० हजार रुपये रोख व दागिने असलेली लोखंडी पेटीच लांबविली होती. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा व जामनेर पोलिसांकडून केला जात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विजय श्यामराव पाटील यांना जामनेरातील गांधी चौकात दोन तरुण असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आहेत व त्याची उधळपट्टी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरुन पाटील यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना दिली. रोहोम यांनी विजय पाटील यांच्या मदतीला सहायक फौजदार अशोक महाजन, सुनील दामोदरे, रवींद्र घुगे, नंदलाल पाटील व भगवान पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने खबऱ्याच्या मध्यस्थीने दोघांना गांधी चौकातच घेरले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख ३३ हजार रुपये रोख व ३ लाख २४ हजार रुपये किमतीचे ६९ ग्रॅम सोने मिळाले. पोलिसांनी हे सोने जप्त करुन दोघांना जामनेर पोलिसात आणले.
नदीपात्रात पेटी फोडून केली वाटणी
या घटनेत सय्यद मुयोद्दीन सय्यद मुकिद्दीन उर्फ पोटल्या हा मुख्य सूत्रधार असून त्याने माळी यांच्या घराची रेकी केली होती. चोरीचा प्लॅन तयार केल्यानंतर आकाश उर्फ चॅम्पियन, वसीम अहमद पिंजारी (रा.भुसावळ) व जितू (रा.भुसावळ) या तिघांना बोलावले. ७ मे रोजीच्या रात्री माळी यांच्या घराच्या परिसरातच थांबून पहाटेच्या सुमारास मागच्या दरवाजाने जाऊन सोने व रोकड असलेली पेटी उचलून भुसावळ रस्त्यावरील नदीपात्रात नेली. तेथे पेटी फोडून रक्कम व दागिन्यांची वाटणी केली. उर्वरित रक्कम फरार असलेल्या दोघांकडे आहे. दरम्यान, माळी यांनी घराच्या दुरुस्तीसाठी बॅँकेत ठेवलेले ८ लाख ५० हजार रुपये काढले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांनी मागचा दरवाजा उघडा ठेवला होता. पेटी उचलत असल्याचा आवाज झाल्याने ते पेटीजवळ आले असता तेथून पेटी गायब झालेली होती.