बाहेर जाऊन येतो सांगून निघाला अन् शेतातील झाडाला घेतला गळफास
By सागर दुबे | Published: April 21, 2023 03:28 PM2023-04-21T15:28:12+5:302023-04-21T15:28:31+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.
जळगाव : बाहेर जाऊन येतो सांगून घराबाहेर निघालेल्या २२ वर्षीय तरूणाने एका शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. राहूल रविंद्र सोनवणे (२२, रा. भिलवाडा, कानळदा) असे मृत तरूणाचे नाव असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.
कानळदा येथे राहूल सोनवणे हा आई, वडील आणि लहान बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होता. करीत होता. गेल्या काही दिवसांपासून हाताला काम नसल्यामुळे राहूल हा घरीच होता. गुरूवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हा राहुल हा बाहेर जाऊन येतो, सांगून घराबाहेर निघाला. त्यानंतर त्याने गावातील किरण राणे यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबीयांची शोधाशोध...
दरम्यान, राहुल हा खूप वेळ होऊन सुद्धा घरी परतला नाही म्हणून आई-वडील चिंतेत होते. त्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केला. मात्र, तो सापडला नाही. अखेर शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास राणे यांच्या शेतातील झाडाला राहुल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नंतर सोनवणे कुटूंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने राहुल याचा मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेला. त्याठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. दरम्यान, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई वत्सलाबाई, वडील रविंद्र सोनवणे, दोन बहिणी असा परिवार आहे.