तापी नदीत पोहायला गेला अन् जिव गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:36 PM2018-09-16T12:36:56+5:302018-09-16T12:37:46+5:30
विदगावचा तरुण
जळगाव : तापी नदीत पोहायला गेलेल्या सूर्यभान रतिलाल कोळी (वय ३२, रा.विदगाव, ता.जळगाव) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी विदगावजवळ घडली. दरम्यान, या नदीत बुडाल्यानंतर तरुणाचा मृतदेह वाहत गेला व दुपारी दीड वाजता अमोदा गावाजवळ नदीपात्रात सापडला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सूर्यभान कोळी हा शनिवारी सकाळी सात वाजता तापी नदीत पोहण्यासाठी गेला होता. तेथे पाण्याचा व खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. दरम्यान, नदीत मासेमारी करीत असलेल्या लोकांना तरुण बुडत असल्याचे लक्षात आल्यांनी त्यांनी तातडीने नदीत उड्या घेऊन सूर्यभानचा शोध घेतला, मात्र वाहत्या पाण्यासोबत तो वाहून गेला. दुपारपर्यंत नदीपात्रात शोध घेऊनही उपयोग झाला नाही. मासेमारी व पाण्यात शोध घेणारे तरुण हताश झाले तर दुसरीकडे कुटुंबाचा आक्रोश सुरु होता.
१२ कि.मी.अंतरावर सापडला मृतदेह
नदीपात्रात शोध घेत असताना १२ कि.मी.अंतरावर असलेल्या अमोदा गावाजवळ नदीकाठी दुपारी दीड वाजता सूर्यभानचा मृतदेह आढळून आला. तेथून पोलीस पाटील व गावकऱ्यांनी हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करुन मृतदेह लगेच विदगाव येथे नेण्यात आला. सूर्यभान हा चालक होता. त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आई व वडील असा परिवार आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.